गरीब मुलींच्या सामूहिक विवाहाने झाली अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याची सुरुवात
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या विधींची सुरुवात गरीब मुलींच्या सामूहिक विवाहाने झाली. मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या पालघरमधून वंचित कुटुंबातील 50 हून अधिक जोडपी आली होती. रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सामूहिक विवाहात वधू-वर पक्षातील सुमारे 800 लोक सहभागी झाले होते. या निमित्ताने अंबानी कुटुंबाने असे अनेक सामूहिक विवाह आयोजित करण्याचा संकल्प केला. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबीयांसह सामूहिक विवाहात सहभागी झाले होते. अंबानी कुटुंबाने नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले.
अंबानी कुटुंबाच्या वतीने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, लग्नाची अंगठी आणि नाकातील चमकी यासह विविध सोन्या-चांदीचे दागिने भेट देण्यात आले. याशिवाय प्रत्येक वधूला 1 लाख 1 हजार रुपयांचा 'स्त्रीधन'चा धनादेशही देण्यात आला. प्रत्येक जोडप्याला वर्षभरासाठी पुरेसा किराणा सामान आणि घरगुती वस्तू देखील भेट देण्यात आल्या, ज्यामध्ये भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, गाद्या, उशा इत्यादी 36 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित लोकांसाठी भव्य मेजवानीही आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वारली जमातीतर्फे पारंपारिक तारपा नृत्य सादर करण्यात आले.
अंबानी कुटुंब प्रत्येक मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमाची सुरुवात मानव सेवेने करते. यापूर्वी देखील, कुटुंबातील लग्नाच्या निमित्ताने, अंबानी कुटुंबाने जवळपासच्या समुदाय आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने लोकांसाठी अन्न सेवा चालवली होती.