सेल्फी निर्णयाला तूर्तास स्थगिती - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
अनेक दिवसा पासून विवादात अडकलेल्या शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षण विभागाने घेतलेला सेल्फी बाबतचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यांची उपस्थिती नियमित राहावी, कोणते विद्यार्थी उपस्थित नाहीत, याचा शोध घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी सेल्फी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र याची अंमलबजावणी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी असलेला निर्णय काही अधिकाऱ्यांनी सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू केला, संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी लवकरच एकत्र बैठक घेऊन सेल्फी निर्णय केवळ शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी कसा अंमलात आणावा याबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार असून तोपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे, असे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले आहे.