शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By

सात महिन्यांची गर्भवती ऑलिंपिकमध्ये खेळली, या तलवारबाज युवतीचं होतंय जगभरात कौतुक

nada hafej
इजिप्तच्या नादा हाफेजची सध्या चर्चा आहे. कारण ती सात महिन्यांची गर्भवती आहे आणि नुकतीच पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळली आहे.नादा फेन्सिंग म्हणजे तलवारबाजी करते. महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत सेबर प्रकारात नादाचं आव्हान 29 जुलैला झालेल्या दुसऱ्या फेरीत संपुष्टात आलं.
 
पण त्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारा नादानं ती गर्भवती असल्याचं जाहीर केलं. तिची ती पोस्ट आणि खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
त्यानंतर लोक एकीकडे तिचं कौतुक करतायत, तर कुणाला याचं आश्चर्य वाटतंय.
महिला खेळाडूंच्या शारिरीक क्षमतेविषयी कुणाला शंका वाटते आहे तर कुणी हे सगळ्याच जणींना शक्य होत नाही, यावरही बोलतंय.
 
नादा हाफेझ कोण आहे?
नादा हाफेझ 26 वर्षांची आहे आणि कैरोची रहिवासी आहे. कैरो विद्यापीठातून तिनं वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे आणि तिथेच पीडियाट्रिक विभागात कामही केलं आहे.
 
नादा लहान असताना जलतरण स्पर्धांतही सहभागी झाली आणि राष्ट्रीय पातळीवर जिम्नॅस्टिक्समध्येही खेळली. पण वयाच्या अकराव्या वर्षी तलवारबाजीकडे वळली.
 
तलवारबाजीच्या सेबर प्रकारात गेलं दशकभर ती इजिप्तचं प्रतिनिधित्व करते आहे.
सेबर तलवारबाजी हा एक कौशल्याची परीक्षा पाहणारा खेळ आहे. यात विद्युतवेगानं तलवार चालवावी लागते आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागतं.
 
पॅरिस ऑलिंपिक हे नादाचं तिसरं ऑलिंपिक आहे. याआधी 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये आणि त्यानंतर टोकियो ऑलिंपिकमध्येही ती सहभागी झाली होती.
 
पॅरिसमध्ये नादानं महिलांच्या वैयक्तिक सेबर गटात पहिल्या फेरीत अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोवस्कीला 15-13 असं हरवलं आणि अंतिम सोळा जणींमध्ये प्रवेश केला. पण दक्षिण कोरियाच्या जेऊन हेयंगनं तिला 7-15 असं हरवलं.
 
या पराभवानंतर नादानं सोशल मीडियावर पोस्ट केली आणि ती गर्भवती असल्याचं जाहीर केलं.
 
नादा म्हणते, “सात महिन्यांची गरोदर ऑलिंपियन... तुम्हाला मंचावर खेळताना दोन खेळाडू दिसल्या असतील. पण तिथे प्रत्यक्षात आम्ही तिघं होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ.”
“मला आणि माझ्या बाळाला आव्हानांचा सामना करावा लागला. शारिरीक असो, वा मानसिक.
 
“गर्भारपण हे एरवीही तारेवरची कसरत असतं, पण त्यातच खेळ आणि जीवनाचा ताळमेळ राखणं आणखी कठीण असलं तरी समाधानकारकही होतं.”
 
अंतिम सोळा जणांमध्ये स्थान मिळवता आलं याविषयी आपल्याला समाधान वाटत असल्याचं नादा सांगते.
 
“मी नशीबवान आहे, या प्रवासात नवरा इब्राहिम इलहाबनं विश्वास ठेवला आणि कुटुंबानं साथ दिली. तिसऱ्यांदा ऑलिंपिक खेळते आहे, आणि यंदा एका छोट्या ऑलिंपियनची साथ मिळाली आहे.”
 
गर्भवती असताना खेळलेल्या खेळाडू
महिला खेळाडू गरोदरपणात ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
इतकंच नाही, तर अनेक महिलांनी गर्भवती असताना ऑलिंपिक पदकं जिंकली आहेत. तीही अगदी तिरंदाजी, नेमबाजीपासून ते जलतरण, आईस हॉकी, स्केटिंग, घोडेस्वारी सारख्या खेळांत.
जुनो स्टोव्हर-आयर्विन या अमेरिकन जलतरणपटूनं साडेतीन महिन्यांची असताना 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवलं होतं.
 
तर चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना इमॉन्सनं प्रेग्नंट असताना बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. मलेशियाच्या नूर सुर्यानी मोहम्मद ताईबी हिनं तर आठ महिन्यांची गर्भवती असताना लंडन ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत सहभाग घेतला होता.
 
अमेरिकेच्या अ‍ॅलिसिया मॉन्टॅनोने तर एकदा नाही तर दोनदा गरोदरपणातच अमेरिकन ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटर शर्यतीत भाग घेतला होता.
 
टेनिसस्टार सेरेना विल्यम्सनं 2017चं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं, तेव्हा ती साधारण दोन महिन्यांची गरोदर होती.
2023 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला फुटबॉल विश्वचषकात अनेक 'मॉम्स' खेळताना दिसल्या. त्यानंतर गरोदरपणात खेळाडूंना रजा आणि पगार देण्याच्या फिफाच्या मॅटर्निटी धोरणाचीही तेव्हा चर्चा झाली होती.
‘घरच्यांचा पाठिंबा महत्त्वाचा’
थोडक्यात, गरोदरपणात किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच खेळाडूंना खेळताना पाहणे आता सामान्य होऊ लागले आहे.
 
पण तरीही मातृत्व आणि खेळ अशी दुहेरी जबाबदारी पेलणं सोपं नसतं. याविषयी भारताच्या ऑलिंपियन रायफल नेमबाज आणि सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक असलेल्या सुमा शिरूर यांचं मत बोलकं आहे.
सुमा यांचा समावेश भारतातल्या त्या महिला खेळाडूंमध्ये केला जातो ज्यांनी खेळ आणि मातृत्वाशी निगडित रूढीवादी कल्पना मोडून काढल्या.
 
2001 साली सुमा सहा महिन्यांची गरोदर असताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळल्या होत्या. तर पुढच्याच वर्षी त्यांनी एशियाड आणि कॉमनवेल्थ गेम्समध्येही पदकं कमावली तर 2004 सालच्या ऑलिंपिकची फायनल गाठली.
 
बीबीसी मराठीला याआधी दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, “22 वर्षांपूर्वी मी एकटीने हे केले होते. माझ्या सासूबाई पहिल्या प्रसूतीनंतर प्रवासात माझ्यासोबत होत्या. दुस-यांदा आई माझ्यासोबत प्रवास करत होती.”
 
असा पाठिंबा असला, तरी वास्तव हे आहे की आजच्या व्यावसायिक आणि स्पर्धात्मक खेळांच्या जगात महिला खेळाडूंना मातृत्व आणि खेळातील करिअर यापैकी एकाची निवड करावी लागते. विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये.
 
त्यामुळे अशा खेळाडूंसाठी सपोर्ट सिस्टिम तयार करणं गरजेचं असल्याचंही सुमा यांनी नमूद केलं होतं.
 
‘आई’ साठी ऑलिंपिकमध्ये खास व्यवस्था
पॅरिसमध्ये खेळाडू जिथे राहतायत, त्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक व्हिलेजमध्ये लहान मुलांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
 
ऑलिंपिकच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. याआधी ऑलिंपिक व्हिलेजमध्ये मुलांना आणण्यास मनाई होती. त्यामुळे तान्हं बाळ असलेल्या खेळाडूंना अनेक अडचणी यायच्या.
यावेळी मात्र ऑलिंपिक व्हिलेजमध्ये एक नर्सरी तयार करण्यात आली आहे. या नर्सरीमध्ये खेळण्यासाठी जागा, कपडे-नॅपी बदलण्यासाठी जागा, बाळाला स्तनपान देता येईल यासाठी वेगळी व्यवस्था अशा गोष्टींचा समावेश आहे.
 
खेळाडू आणि आई अशा दोन्ही जबाबदाऱ्या महिलांना पेलता येईल अशी सोय इथे केली आहे.
 
एकीकडे ऑलिंपिक आयोजकांनी उचललेल्या या पावलाचं कौतुक केलं जात असतानाच अशी व्यवस्था सर्व महिलांना उपलब्ध नाही, याकडेही काहींनी लक्ष वेधलं आहे.
एप्रिल 2024 मध्ये ब्युटी प्रोडक्ट बनवणारी कंपनी 'मामाअर्थ'ची प्रमुख गझल अलघनं गर्भावस्थेविषयी केलेल्या एका पोस्टची बरीच चर्चा झाली होती, तेव्हाही हा मुद्दा अनेकांनी उचलून धरला होता.
 
गझल यांनी आठ महिन्यांची गर्भवती असूनही आपण 12 तास काम करत असल्याचं म्हटलं होतं. महिला गर्भावस्थेत काम करू शकत नाही, ही पुरुषांची मानसिकता मला बदलायची होती," असं त्या म्हणाल्या होत्या.
 
त्यावर काही प्रतिक्रिया आल्या होत्या की, “गझल यांना कुटुंब, घरच्यांची मदत, वैद्यकीय कर्मचारी, नोकरचाकर असा पाठिंबा असल्यानं हा निर्णय घेणं सोपं गेलं. पण प्रत्येकाला ही अपेक्षा ठेवता येणार नाही."
 
प्रत्येक महिलेची गर्भावस्थेतील स्थिती वेगळी असते. महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे. पण काही महिलांना आराम किंवा कमावरून सुट्टी हा पर्यायही उपलब्ध नसतो, हे वास्तवही विसरता येणार नाही.
 
गरोदरपणात खेळणं सुरक्षित आहे का?
नादा हाफेजचा फोटो पाहिल्यावर अनेकांनी गरोदर असताना खेळणं बाळासाठी सुरक्षित आहे का? असाही प्रश्न विचारला.
कारण पारंपरिकरित्या गर्भवती महिलांना विश्रांती घ्या, फार दगदग करू नका असा सल्ला अनेकदा दिला जातो.
व्यायाम आणि खेळानं महिलांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो असाही गैरसमज दीर्घकाळ रूढ होता. मात्र असं काही नसल्याचं विज्ञानानं सिद्ध केलं आहे.
 
तुम्ही शारिरीकदृष्ट्या सक्षम, फिट असाल तर गरोदर असतानाही व्यायाम करण्यास किंवा खेळण्यास हरकत नाही, असं आजवरचं संशोधन सांगतं. अर्थात प्रत्येक महिलेच्या बाबतीत परिस्थिती वेगळी असते, याकडेही डॉक्टर्स लक्ष वेधून घेतात.
 
गरोदरपणात खेळणं कितपत सुरक्षित आहे, यावर संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं 2016 मध्ये एका तज्ज्ञांच्या गटाची बैठक बोलावली होती. त्यांनी तयार केलेला अहवाल ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडीसिनमध्ये प्रकाशित केला होता.
 
त्या अहवालाच्या मुख्य लेखिका आणि नॉर्वेर्जियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायन्सेसच्या प्राध्यापक कारी बो सांगतात, “आघाडीच्या अनेक खेळाडू गरोदर असतानाही सराव करत राहतात आणि त्याचा त्यांच्यावर काही नकारात्मक परिणाम होत नाही. तसंच यामुळे आई किंवा बाळाला काही धोका निर्माण झालेला दिसत नाही.”
 
खेळाडूंसाठी गरोदरपणा सोपा जात असल्याचाही काही पुरावा नाही, असंही हा अहवाल नमूद करतो. हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांत या विषयावर संशोधन झालं आहे, पण आणखी संशोधन गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
महिला खेळाडूंचे कपडे आणि स्पोर्टस ब्रा डिझाईन करताना गरोदरपणाचा आणि मातृत्त्वाचा विचार करण्याकडे कल वाढतो आहे.
 
आजवर महिलांच्या अनेक प्रश्नांवर आणि मुद्यांवर मार्ग काढण्यात महिला खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. गरोदरपणा आणि मातृत्वाविषयी समजुती बदलण्यातही ती महत्त्वाची ठरेल असं अनेकांना वाटतं.
 
Published By - Priya Dixit