शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (09:16 IST)

पुण्यात करोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांना अशाा अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. बाधित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यास वाहनचालक नकार देत असल्याच पाहायला मिळत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत म्हणून काही तरुण एकत्र आले आहेत. पाच रिक्षाद्वारे शहरातील कानाकोपऱ्यातील करोनाबाधित रुग्णांना पैसे न घेता मोफत रुग्णालयात घेऊन जात आहेत. राहुल शिंदे असं रिक्षाचालक आणि मालकाचे नाव आहे. समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने हे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज दोन हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. काही जणांचा मृत्यूदेखील होत आहे. अनेकदा रुग्णांना वाहन न मिळाल्याने वेळेत उपचार मिळत नाहीत, त्यामुळे पुढील परिस्थितीला संबंधित कुटुंबाला सामोरे जावे लागते. शिवाय, शहरातील प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिका मिळेलच असे नाही. त्यामुळे शिंदे यांच्या स्वतः च्या मालकीच्या पाच रिक्षा असून लॉकडाउन असल्याने एकाच जागी थांबून आहेत. मात्र, त्याचा समाजासाठी उपयोग करत बाधित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्याचं काम ते करत आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांचे मित्र शुभम दुबळे, रवींद्र जाधव, मनोज सुतार, सुधीर कांबळे हे धावून आले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर यापैकी जो उपलब्ध असेल तो व्यक्ती त्या रुग्णापर्यंत पोहचतो आणि रिक्षाने रुग्णालयात घेऊन जातो असं राहुल शिंदे यांनी सांगितलं. त्यांचं हे काम पाहून सर्वत्र कौतुक होत आहे.