मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (23:11 IST)

Rajya Sabha अहमद पटेल: जेव्हा रात्री 2 वाजता राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला होता...

महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज (10 जून) मतदान पार पडलं. मात्र, मतमोजणी अजूनही सुरू झाली नाही. भाजप आणि काँग्रेसनं मतदाना दरम्यानच्या काही घटनांवरून आक्षेप नोंदवल्यानं मतमोजणीस उशीर झाला आहे.
 
अगदी पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमध्येही असाच प्रकार घडला होता आणि तिथे तर मध्यरात्री दोन वाजता निकाल जाहीर झाला होता. विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीपर्यंत जागून जल्लोष साजरा केला होता.
 
गुजरातमधील मध्यरात्री निकाल जाहीर झालेल्या या निवडणुकीचे विजयी उमेदवार होते काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल.
 
त्यावेळी काय घडलं होतं, हे जाणून घेऊ.
 
2017 साली गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान पार पडलं. दोन जागा भाजपनं सहज जिंकल्या. या जागांवरून अमित शाह आणि स्मृती इराणी विजयी झाले. मात्र, तिसऱ्या जागेसाठी चुरस होती. तिसऱ्या जागी भाजपकडून बलवंतसिंह राजपूत उभे होते, तर काँग्रेसकडे अहमद पटेल.
 
अहमद पटेल म्हणजे काँग्रेसचे अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव. अहमद पटेल यांचा विजय किंवा पराजय म्हणजे सोनिया गांधींचा विजय किंवा पराजय असं ते गणित होतं. त्यामुळे निवडणुकीची चुरस प्रचंड वाढली होती.
 
मतदानाच्या दिवशी आणि रात्री काय घडलं?
तिसऱ्या जागेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीस सुरुवात झाली आणि काही मिनिटांतच थांबवावी लागली. ही मतमोजणी तब्बल 6 तास थांबवून रात्री दोन वाजता निकाल जाहीर करण्यात आला. मतमोजणी थांबवण्याचं कारण होतं आधी काँग्रेस आणि नंतर भाजपनं घेतलेला आक्षेप.
 
काँग्रेसनं आक्षेप घेत, निवडणूक आयोगाकडे मागणी केली की, 'आमच्या दोन बंडखोर आमदारांची मतं रद्द करावी.'
 
काँग्रेसच्या या मागणीवर भाजपनं आक्षेप घेतला. तसंच, भाजपचे काही नेते आणि केंद्रीय मंत्री निवडणूक आयोगाकडे जाऊन काँग्रेसच्या मागणीला विरोध दर्शवला. काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षाचे नेते निवडणूक आयोगासमोर गेले होते.
 
निवडणूक आयोगानं मध्यरात्री आपला निर्णय जाहीर केला. काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांची मतं रद्द ठरवण्याचा निर्णय आयोगानं घेतला. याचा अर्थ असा झाला होता की, राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी दोन्ही उमेदवारांन 45 च्या तुलनेत 44 मतांची आवश्यकता राहिली होती.
 
निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांची मतं रद्द करण्याचा निर्णय यासाठी घेतला की, या दोन्ही बंडखोर आमदारांनी मतदानादरम्यान भाजपच्या पोलिंग एजंटना आपलं बॅलेट दाखवलं होतं.
 
निवडणूक आयोगाचा निर्णय अहमद पटेल यांचं पारडं जड करणारा ठरला.
 
अहमद पटेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव होते. त्यामुळे अहमद पटेल यांचा विजय हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेलांच्या बंडखोरीनंतर अहमद पटेल यांचा विजय काँग्रेससाठी दिलासादायक ठरला.
 
या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्वीट केला होता की, 'सत्यमेव जयते.'
 
अहमद पटेल पुढे म्हणाले होते की, "हा केवळ माझा विजयच नाहीय, तर लाजिरवाण्या पद्धतीने पैसे, ताकद आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांचा पराभवही आहे."
 
अहमद पटेल यांचं महत्त्व
अहमद पटेल तीनवेळा लोकसभेत काँग्रेसकडून निवडून आले, तर पाचवेळा ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पण फक्त यामुळेच त्यांना मोठा नेता मानलं जायचं नाही.
 
काँग्रेसमधील गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड महत्त्व होतं.
 
1977 ची गोष्ट आहे. त्यावेळी काँग्रेस पराभवाच्या जखमांनी घायाळ झालेली होती. त्यावेळी अहमद पटेल आणि त्यांचे सहकारी सनत मेहता यांनी इंदिरा गांधींना आपल्या मतदारसंघात भरुचला बोलावलं. याच दौऱ्यांनंतर इंदिरा गांधी यांचं पुनरागमन सुरू झालं होतं.
 
पण अहमद पटेल काँग्रेसच्या पहिल्या फळीत 1980 आणि 1984 दरम्यान आले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यानंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी राजीव गांधी यांना तयार केलं जात होतं. तेव्हा लाजाळू स्वभावाचे अहमद पटेल राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये आले.
 
तो काळ जवळून पाहिलेले लोक सांगतात, की राजीव गांधी गुजरात दौऱ्यावर यायचे तेव्हा अहमद पटेल त्यांना शेव, चिवडा आणि शेंगदाणे हे पदार्थ द्यायचे. राजीव गांधींना हे पदार्थ खूप आवडायचे.
 
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. यावेळी अहमद पटेल खासदार म्हणून निवडून आले होते. सोबत त्यांना संयुक्त सचिवही बनवण्यात आलं. पुढे काही काळ त्यांना संसदीय सचिव आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिवही बनवण्यात आलं.
 
कार्यकर्त्यांवर पकड
लोकांना नावासहित ओळखणारे नेतेच राजकारणात यशस्वी होतात, असं म्हटलं जातं.
 
अहमद पटेल काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना ओळखायचे, ज्यांची नावं जास्त लोकांना माहिती नव्हती.
 
अहमद पटेल यांना भेटणार आहे, ती व्यक्ती काय बोलेल याचा ते अंदाज घेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याची माहिती ठेवत. यामुळेच पक्षात त्यांचं स्थान वेगळं होतं.
 
ते रात्री उशिरापर्यंत काम करत बसायचे. कोणत्याही वेळी रात्री एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याला फोन करून ते एखादं काम सोपवायचे.
 
अत्यंत नियोजनबद्धरित्या ते काम करायचे. त्यांचा एक फोन सतत त्यांच्या जवळ असायचा. हा नंबर कुणाकडेच नव्हता. त्यावर फक्त 10 जनपथवरून फोन यायचे.