शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (11:46 IST)

संभाजीराजे छत्रपतीः उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला, निवडणूक लढवणार नाही

SAMBHAJIRAJE CHHATRAPATI
राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची उमेदवारी तत्काळ जाहीर करू, अशी ऑफर शिवसेनेने दिली होती.
 
पण अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका मांडून मी ती ऑफर नाकारली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला, अशी टीका माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
 
तसंच, घोडेबाजार टाळण्यासाठी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत. पण ही माघार नसून हा माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
 
आज (27 मे) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे म्हणाले, "जे मी बोलणार आहे, ती माझी मुळीच इच्छा नाही. माझ्या तत्वात ते नाही. माझ्या रक्तात ते नाही. पण तरीसुद्धा मला बोलायचं आहे."
 
ते पुढे म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, जिथं कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, तिथं आपण दोघे जाऊ, मी खोटं बोलत आहे का, असं तुम्ही तिथे सांगावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला आहे."
 
" मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले. शिवसेनेत प्रवेश केल्यास तत्काळ उमेदवारी जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं. पण शिवसेनेत प्रवेश करू शकत नसल्याचं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर फोन करून बोलावलं होतं. मी त्यांच्यासमोर राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव मान्य करण्यात आला होता, असं संभाजीराजे म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "बैठकीवरून कोल्हापूरला परतत असताना मी शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या बातम्या नंतर सुरू झाल्या. यानंतर माझे कोल्हापुरातील सहकारी संजय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला, याचं मला खूप वाईट वाटलं," असं संभाजीराजे म्हणाले.
 
"माझी खरी ताकद जनता आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार, शिवसेनेबाबत कोणताही द्वेष नाही. पण मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही," असं संभाजीराजे म्हणाले.
 
संभाजीराजे पूर्वीच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते?
संभाजीराजे छत्रपतींनी चार दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.
 
"माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली आहे. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं आहे ते सविस्तर ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्या प्रमाणे करतील. मला हा देखील विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील," असं संभाजीराजे म्हणाले.
 
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या संदर्भातील चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना 'वर्षा'वर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. आज (23 मे) ही भेट होणार होती. मात्र, संभाजीराजे त्यांना भेटले नव्हते.
 
राज्यसभेसाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे तर संभाजीराजेंना असं वाटतं की महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
 
तेव्हा संभाजीराजे हे शिवबंधन बांधणार की स्वतंत्र राहणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण पुढील घडामोडींनंतर शिवसेनेने संजय राऊत यांच्यासह संजय पवार यांना उमेदवारी देत असल्याचं जाहीर केलं.
 
संभाजी राजे कुठल्याही पक्षाच्या बंधनात अडकायला का तयार नाहीत?
संभाजीराजे हे सध्या मराठा समाजाच्या आंदोलनातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात, अशा वेळी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढताना जर संभाजीराजे शिवसेनेतील नेते असतील तर मात्र पक्षीय चेहरा म्हणून याचा आंदोलनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
त्यात संभाजीराजेंनी स्वतःची 'स्वराज्य' नावाची संघटना स्थापन करून त्यांचा पुढचा राजकीय मार्ग स्पष्ट केलाय. एखाद्या पक्षात जाणं म्हणजे स्वतःच्याच संघटनेचं अस्तित्व दुय्यम करण्यात सारखं होऊ शकतं. त्यामुळेसुद्धा संभाजीराजे कुठल्या पक्षात जाण्यास तयार नसावेत.
 
"एखाद्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाच्या कलानं वागवं लागतं. स्वतंत्र निर्णय घेऊन कार्यक्रम राबता येत नाही. ते नको म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा," असं श्रीमंत माने यांना वाटतं.
 
यावर सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार यांच्याशी चर्चा केली असता ते सांगतात, "संभाजीराजे यांचा आजवरचा प्रवास पाहता कोणत्याही पक्षाची जवळीक नको आहे, पण तरीही पद हवं आहे. भाजपने त्यांना गेल्यावेळी राष्ट्रपतीनियुक्त खासदार केल्याने राजेंना आताही तशाच प्रकारे राज्यसभेत जायचं आहे. पण त्यावेळची कारणं वेगळी होती. मराठा आंदोलन, मोर्चामुळे राजकीय वातावरण गरम होतं. त्यामुळे मराठा चेहरा म्हणून भाजपने त्यांना संधी दिली. मात्र हे नेहमीच घडेल याची शक्यता फार कमी असते. पक्षीय विचारसरणी किंवा चौकटीत न राहता पद मिळवणं हे संभाजी राजेंसाठी सध्या तरी कठीण आहे."