गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (21:43 IST)

मासिक पाळीमुळे वृक्षारोपणापासून रोखल्याचे प्रकरण, हा तर बनावचा अहवाल

plantation
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव शासकीय आश्रमशाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपण करण्यास मनाई करण्यात आली होती. राज्यभरात हा विषय चर्चेचा ठरला होता. मात्र प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीबाबत असा काही प्रकार घडलाच नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. शाळेत वृक्षारोपण झाले त्या दिवशी संबंधित विद्यार्थिनी गैरहजर असल्याचं समितीने केलेल्या चौकशीत आढळून आले.
 
सदर मुलीने केलेली ही तक्रार बनावट असल्याचे अहवालाअंती समोर आले आहे. सतत गैरहजर असल्यामुळे तिला बारावीचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. विज्ञान शाखेत शिकत असूनही ती गैरहजर असल्याने वर्गशिक्षकाने तिला जाब विचारला होता. तसेच यापुढे शाळेत बसू नेणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीमुळे आपल्याला वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केला असण्याची शक्यता चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
 
मासिक पाळी आली असल्याचे कारणातून आश्रमशाळेच्या शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा आरोप देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेकडे केल्यानंतर संघटनेच्या वतीने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त यांच्याकडे केली होती.या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून देखील घेण्यात आली असून, या प्रकरणी कारवाई करत अहवाल आयोगास सादर करण्याची सूचना केली होती. 
 
दरम्यान,  याविषयी आदिवासी आयुक्तांमार्फत चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीनंतर समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली आहे. आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर यांचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. दोन महिन्यांपासून ही विद्यार्थिनी सतत गैरहजर होती. या कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना या प्रकरणाचा बनाव केला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणी यांनी सदर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासला असता, ज्या दिवशी वृक्षारोपण झाले, त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती, असे आढळून आले. तसेच ती विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत उपस्थित होती, असे चौकशीतून उघड झाले आहे. सदर विद्यार्थिनी आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका राजकीय पक्ष संघटनेची सदस्य आहे.