बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (20:42 IST)

पुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करण्यात येणार

कोकणासह राज्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ही पूरस्थिती रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत दगावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्याचे प्रमाण आणि परिणाम आपण ठरवू शकत नाही. कुणीही ढगफुटीचा अंदाज वर्तवू शकत नाही. कोल्हापूर आणि सांगलीत प्रचंड पूर आला. धरणाचे गेट सोडण्यात येणार होते. त्यामुळे परिस्थिती नाजूक झाली होती. कोकणातही जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे आम्ही वॉटर मॅनेजमेंट करणार आहोत. जल आराखडा तायर करणार आहोत. अचानक पुराचं पाणी वाढतं आणि होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळेच हा जल आराखडा तयार करणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
महाड, चिपळूण, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पाणी भरतं. त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नये आणि घटना घडल्या तर जीवितहानी होऊ नये म्हणून हे व्यवस्थापन करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
यावेळी त्यांनी डोंगर भागात राहणाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावं असं आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.