शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (10:21 IST)

‘भक्तों को चप्पल से मारेंगे’, म्हणणाऱ्यांवर कारवाई, बजरंग दलाच्या तक्रारीनंतर FIR दाखल

social media
'नागपूर के भक्तों को चप्पल से मारेंगे' असं वक्तव्य सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी केल्यानंतर आणि सदरचा व्हीडिओ शेअर झाल्यानंतर नागपूरमध्ये सोशल माडियावर वातावरण तापल्याचं दिसत आहे.
 
या प्रकरणी बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तसंच या प्रकरणी एका जणाला अटकही करून नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचं पोलिसांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
एफआयआरमध्ये नोंद असलेला तरुण हा नागपुरातील असून तो सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आहे. त्याच्याबरोबरच एका प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर महिलेचा समावेशही आहे.
 
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या'चं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनं मात्र यावर बोलणं टाळलं आहे.
 
हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? आणि या प्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला? याबाबत जाणून घेऊयात.
 
'आमच्या भावना दुखावल्या'
नागपुरातील बजरंग दलाचे सुरक्षा प्रमुख हितेश उर्फ बिट्टू सावडिया यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली.
 
संबंधित तरुणाने 30 जुलैच्या रात्री इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केलेल्या व्हीडिओतील आक्षेपार्ह भाषेप्रकरणी ही तक्रार होती.
 
या व्हीडिओत नागपूरच्या भक्तांना चप्पलने मारण्याची भाषा बोलली जात आहे. एक महिला अशा प्रकारचं वक्तव्य करताना दिसत आहे.
 
याबाबत हितेश यांनी 'आम्ही धर्माला मानणारे लोक आहोत आणि भक्त शब्द आमच्या श्रद्धेचा विषय आहे', असं मत मांडलं.
 
'या व्हीडिओमुळं हिंदू धर्माचा अपमान झाला असून, आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं या दोन्ही लोकांवर गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी त्यांनी केली.
 
व्हीडिओ अपलोड करणाऱ्या तरुणावर आणि तसं वक्तव्य करणाऱ्या महिलेवर ही कारवाई झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
बुधवारी सकाळी ही तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी महिला इनफ्लुएन्सर आणि तरुण या दोघांवरही भारतीय न्याय संहिता 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
 
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी 31 जुलैला तरुणाला अटक केली. पण नंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं.
 
तसंच तक्रारकर्त्यांनी महिलेचं नाव घेतलं नसून फक्त एक महिला म्हटलंय. त्यामुळे या महिलेला शोधत असल्याचं सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असराम चोरमले यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
 
व्हीडिओमध्ये नेमके काय?
पण, ज्या व्हिडिओवरून तक्रार दाखल करण्यात आली तो व्हिडिओ नेमका काय आहे?
 
तक्रारदार हितेश उर्फ बिट्टू सावडिया नागपुरातील बजरंग दलाचा सुरक्षा प्रमुख असून त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊटंवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
 
यामध्ये सुरुवातीला संबंधित तरुणाने शेअर केलेला व्हिडिओ जोडण्यात आला.
 
या व्हिडिओत 5,35,000 फॉलोअर्स असणारी अशी एक महिला इन्फ्लुएन्सर दिसत आहे. ही महिला 'चप्पल तो नागपूर से ली हैं. अब इसी चप्पल से मारेंगे यहाँ के भक्तों को,' असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर सगळेच जोराने हसतात.
 
या व्हीडिओनंतर भक्तांना मारण्याची भाषा केल्यामुळं भावना दुखावल्या म्हणत हितेश सावडिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
सध्याच्या काळात सोशल मीडियावर भक्ताच्या अनेक व्याख्या केल्या जातात. त्यामुळं या व्हिडिओतील भक्त शब्दाचा नेमका काय अर्थ घेऊन, थेट तक्रार दाखल केली, असं बीबीसी मराठीनं हितेश सावडिया यांना विचारलं.
 
याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'भक्त म्हणजे इतर काहीही असेल. पण, या व्हीडिओत त्यांना फक्त हिंदू धर्माला मानणाऱ्यांना भक्त म्हणायचं होतं. हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय आहे.'
 
पण, नागपूर के भक्तों को चप्पल से मारेंगे, असं म्हणणारी तरुणी प्रसिद्ध सोशल मीडियावर सतर्क आहे. तसेच ती एक कॉमेडियन असून जोकच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे राजकीय पक्षावर टीका करत असते.
 
'इथल्या हुकूमशाही धोरणाविरोधात माझा लढा आहे', असं ती तिच्या व्हिडिओमधून सांगते.
 
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही इनफ्लुएन्सरसोबत आम्ही संपर्क साधला. पण, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.