शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (11:23 IST)

एकनाथ शिंदे बंड: उद्धव ठाकरेंचा उल्लेख टाळण्यावरून आदेश बांदेकरांनी विचारलं, हा शरद पोंक्षे तुच ना?

shard ponkshe
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टाळल्यासंदर्भात अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी टक्कर देत पोंक्षे यांनी पुनरागमन केलं होतं.
 
शरद पोंक्षे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकतंच त्यांचं 'दुसरं वादळ' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. यावेळी शरद पोंक्षे यांनी नेते एकनाथ शिंदे यांच्यासह फोटो शेअर केला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, त्यावेळी हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत:ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं. सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले'. शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा एक फोटोही त्यांच्या पुस्तकात छापला आहे. चार दिवसांपूर्वीची ही पोस्ट आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच आदेश बांदेकर यांचा उल्लेख नव्हता.
 
यानंतर आदेश बांदेकरांनी एक जुना व्हीडिओ शेअर केला आहे. शेअर करताना त्यांनी हा शरद पोंक्षे तुच ना? असा सवालही त्यांनी केला. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चांना उधाण आलं आहे.
 
कॅन्सरवर मात करुन पोंक्षे पुन्हा एकदा कामाला लागले होते. 2019 मध्ये लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत पोंक्षे म्हणाले होते, मला कॅन्सर झाल्याचं कळताच मी आदेशला हे सांगितलं आणि तोच पहिल्यांदा माझ्या मदतीसाठी धावून आला. काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेंकडे पाठवतो. नांदे हे हिंदू कॉलनीत प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मग त्यांच्याकडे माझी ट्रिटमेंट सुरू झाली. आदेश माझ्या मदतीला धावून आला. आदेशमुळे माझ्या आजाराची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कळली. त्यांनीही मला फोन करुन शरद काळजी करु नका, शिवसेना आणि मी तुझ्या पाठिशी उभे आहोत असं सांगितलं. पैशांची कोणतीही काळजी करू नका असं म्हणाले.
 
शरद पोंक्षेंचे हे शब्द त्यांना पुन्हा आठवून देण्यासाठी आदेश बांदेकरांनी हा जुना व्हिडीओ शेअर केल्याचं दिसून येत आहे. पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली मात्र उद्धव ठाकरेंचा उल्लेख टाळला. आदेश बांदेकरांनी व्हीडिओच्या माध्यमातून हे दाखवून दिलं.
 
बांदेकरांच्या पोस्टखाली पोंक्षेंनी कमेंट करून लिहिलं की, "मित्रा आदेश पुस्तक वाच. त्यात ज्याने ज्याने मदत केलेय त्या प्रत्येकाचे आभार मानलेत. मी तोच शरद पोंक्षे प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा. मी कधीच काहीच विसरलेलो नाही. विसरणारही नाही. पक्षापलीकडची मैत्री आहे आपली. सोबत पुस्तकातला फोटो टाकत आहे".
 
पोंक्षेंनी यानंतर पुस्तकातल्या एका पानाचा फोटो शेअर केला आहे. आदेश बांदेकरांना टॅग करून त्यांनी लिहिलं की शरद पोंक्षे काहीही विसरत नाही.
 
त्यात त्यांनी लिहिलंय, "आता डॉक्टर कसा शोधायचा? आणि एकदम आदेश बांदेकरची आठवण झाली. हा असा एक जिवलग मित्र आहे की संकटसमयी त्याची आठवण येते. फक्त मलाच नाही तर अनेक कलावंतांना. त्याची खासियत ही आहे की सर्वांसाठी तो मदतीला धावून जातो. आदेशला फोन केला, तो त्याच्या कुटुंबासोबत देवदर्शनाला गेला होता. तुळजापूरच्या मंदिरात. मला म्हणाला अर्ध्या तासात फोन करतो. मी आणि विवेकने तिथेच त्याच्या फोनची वाट बघितली. 40 मिनिटांनंतर त्याचा फोन आला तो सरळ उत्तर घेऊनच. मला म्हणाला, दादरला हिंदू कॉलनीत डॉ. श्रीखंडेंचं क्लिनिक आहे. तिथे त्यांचे जावई डॉ. आनंद नांदे आहेत त्यांना भेट. लगेच उद्या दुपारी 12 ची वेळ घेतलीये, तू जाऊन भेट. इतक्या तत्परतेने आदेशने कुटुंबासोबत देवदर्शन करत असूनही डॉ. नांदेंसोबत बोलून माझी भेट ठरवली. असा हा आदेश, सहृदयी माणूस."