मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (14 सप्टेंबर) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस स्वीकारुन उपोषण सोडलं.
त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्याचबरोबर रोहयोमंत्री सांदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे उपस्थित होते
यावेळेस बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात हे मी पहिल्यापासून सांगत आहे. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा माणसाला तुमच्याबद्दल आशा आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे आरक्षण देऊनच मी थांबणार आहे. सरकारने 1 महिन्याची मुदत मागितली आहे. मी समाजाला विचारून ही मुदत देण्याबद्दलचा निर्णय घेतला. समाजाच्या निर्णयानुसार मी हा निर्णय घेतला. यापुढेही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी एका महिन्याच्या मुदतीनंतर आणखी 10 दिवस मुदत वाढवून देत आहे "
यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मी मनोजला गेली अनेक वर्षं ओळखत आहे. तो नेहमीच समाजाच्या कामासाठी लढत आला आहे. मी मनोजला मनापासून शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो. जिद्दीनं चिकाटीनं आंदोलन पुढं नेणं, जनतेचा प्रतिसाद मिळणं हे कमीवेळा पाहायला मिळतं. ज्याचा हेतू शुद्ध असतो त्याच्यामागे जनता उभी राहाते. लोकांनी तुम्हाला पहिल्यापासून पाठिंबा दिला. उपोषण सोडण्याची विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मराठा आरक्षण देण्याची आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे ज्या मुलांच्या नोकरीवर स्थगिती आली होती. त्या 3700 लोकांना मी निर्णय देण्याचा निर्णय घेतला आणि दिल्याही. सारथी, अण्णासाहेब पाटील विकास मंडळालाही निधी दिला. ओबीसीला मिळणारे सर्व फायदे देण्याचा प्रयत्न करत आहोत."
"इथं झालेली घटना दुर्दैवी आहे. त्यावर गृहमंत्र्यांनी माफी मागितली आहे. मराठा समाज शिस्तप्रिय आहे. आजवर शांतता बिघडेल असं कधीही वर्तन झालेलं नाही. मराठा समाजाकडून देशानं शिकवण घेतली. परंतु त्याला गालबोट लागलं. ज्यांचा याच्याशी संबंध होता त्यांना निलंबित केलं. ज्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचे तात्काळ आदेश दिले."
13 सप्टेंबरला रात्री उशिरा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
जरांगे यांच्या भेटीनंतर या दोघांनी तासभर अंतरवाली सराटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात बंद दाराआड चर्चा केली.
त्यानंतर रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन उपोषणस्थळी परतले. यावेळी दानवे यांच्या हातात एक चिठ्ठी होती.
ती त्यांनी जरांगे यांना आणि उपोषण स्थळी असलेल्या कार्यकर्त्याना दाखवली. त्यानंतर त्यांनी ती खिशात ठेवली.
या चिठ्ठीत काय लिहिलं आहे असे विचारल्यावर, मनोज जरांगे यांचे नंबर माझ्याकडे नव्हते ते लिहून घेतले असे ते म्हणाले.
आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत असेही दानवे म्हणाले.
दरम्यान, यावेळी केवळ भाजपचेच नेते उपस्थित असल्यामुळे त्यामुळेही राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (12 सप्टेंबर 2023) रोजी सरकारला मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घ्यायला एक महिन्याचा वेळ दिला आहे. एक महिन्यानंतर सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा आंदोलकांविरुद्ध आंदोलन मागे घ्यावे, तसंच लाठीमार करणाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच संभाजीराजे आणि उदयनराजे यावेत. अशी मागणी त्यांनी केली. आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत.
ते म्हणाले, “आपल्या लेकराच्या तोंडाजवळ घास आलाय. मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. सरकारला आता काम राहिले नाही. सगळे तज्ज्ञ हुशार नाही असं म्हणता येणार नाही. सगळ्यांचं एक म्हणणं आहे. आरक्षणाची लढाई छोटी नाही. ती खूप मोठी आहे.”
“माझी द्विधा मनस्थिती आहे. तुम्ही मला सांगा मी करायचं का हे तुम्ही मला सांगा” असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं.
“शेवटच्या मराठ्याला पत्र मिळणार नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही. मला काही करून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. तोपर्यंत मी घरी जाणार नाही. मला वाटतं आपण एका महिना ऐकावं. तरी ही मी जागा सोडणार नाही हे नक्की. मी दोन पावलं मागे घेतो. माझ्या जातीसाठी मी दोन पावलं घेतो. मात्र मी ही जागा सोडणार नाही. मात्र एक महिन्यानंतर आरक्षण दिलं नाही तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्राची सीमा ओलांडू देणार नाही.” असंही ते म्हणाले.
हातात दगड घेऊ नका. त्याने काही होणार नाही. आपल्यावर केस दाखल होतील, मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो.
महिनाभर गावागावत साखळी उपोषण चालवायचे आहेत. तयारीला लागा असं आवाहनही त्यांनी केलं.
आमरण उपोषणाचे साखळी उपोषणात रुपांतर करतो. पण आंदोलनाची धग तीच ठेवूया असंही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज सुटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे महसुली, शैक्षणिक, निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील, अशी घोषणा केली होती.
मात्र, राज्य सरकारनं जीआरमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळीचे दस्तऐवज देण्याची अट काढून टाकावी, आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं," अशी मागणी करत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं नव्हतं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि जरांगेंच्या मागण्यांवर काल (11 सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक झाली.
या बैठकीत जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण त्वरीत मागे घेण्याचा ठराव सर्वांनी एकमताने मंजूर केला.
“सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीला जरांगे यांनी वेळ द्यावा अशी मी विनंती जरांगे यांना करतो, तसंच जरांगे पाटील किंवा त्यांच्या कोणा सदस्याला समितीमध्ये घेण्यास सरकार तयार आहे, तसंच समितीला एक महिन्याचा अवधी दिलेला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
“आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना अधिकाऱ्यांना दिला आहे. तसंच आंदोलकांच्या मागणीनुसार तीन अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आलंय,” असं शिंदे यांनी पुढे सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचं तसंच इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता आरक्षण देण्यावर एकमत झाल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
या सर्व निर्णयांची माहिती आज (12 सप्टेंबर) अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांना दिली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुजी आले आहेत, ही आनंदाची गोष्ट असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. आपल्याला या लढ्यासाठी बळ मिळालं आहे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची अवस्था संभाजी भिडे यांनी केली. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, फडणवीस त्यांचा शब्द पाळतील असं आश्वासन भिडे यांनी यावेळी मनोज जरांगे यांना दिलं.