शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (21:49 IST)

नाशिकमध्ये कृषी प्रदर्शन कृषीथॉनचे उदघाटन संपन्न

krushi festival
नाशिक : प्रतिनिधी                                                                 
जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा स्वीकार आधुनिक शेतीसाठी व्हावा. कृषिक्षेत्रात मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. आज मोठ्या प्रमाणात पीक पद्धती बदलत आहे. वातावरणातील बदल, अवकाळी, गारपीट इ. संकटावर मात करून शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहे. त्यासाठी कृषीथॉन प्रदर्शन महत्वपूर्ण आहे. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री ना. दादा भुसे यांनी सांगितले. ते आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉनच्या  उदघाटन सोहळ्यात बोलत होते.  
      
ते पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात ७० टक्के क्षेत्रावर कापूस, सोयाबीन पीक घेतले जाते. या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून पी.एम.किसान, नमो शेतकरी, एक रुपयात पीकविमा अशा अनेक योजना शेतकरी हितासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. गेली २५ वर्ष कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या न्याहारकर कुटुंबाचे कौतुकही  ना.  दादा भुसे यांनी केले. या कार्यक्रमाचे उदघाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. 
 
 
यावेळी कृषीथॉन विशेष सन्मान प्राप्त करणाऱ्या पुरस्कारार्थीचा गौरव ना. दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यात आदर्श कृषी अधिकारी सन्मान विवेक सोनावणे यांना,आदर्श मिलेट प्रक्रिया उद्योजक सन्मान महेंद्र छोरीया, आदर्श कृषी उद्योजक सन्मान मधुकर गवळी, कृषी महर्षी सन्मान डॉ. सतीश भोंडे, कृषी महर्षी सन्मान कृष्णा भामरे, आदर्श कृषी शिक्षण विस्तार कार्य सन्मान के.के.वाघ कृषी महाविद्यालय यांचा समावेश आहे.
 
कृषीथॉनच्या १६ व्या आवृत्तीत तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ड्रोन, विविध अॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन  विषयावरचे चर्चासत्र हे  यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने  कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचा प्रयत्न अखंडपणे होत  आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्रांचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
 
फोटो कॅप्शन : आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉनचा उद्घाटन सोहळा दीपप्रज्वलन करून संपन्न झाला. दीपप्रज्वलन करतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे समवेत मा. खा. देविदास पिंगळे,  संजय न्याहारकर, अजय बोरस्ते, . अरुण मुळाणे, . चंद्रकांत ठक्कर, श्री. साहिल न्याहारकर