रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सावधान शेतकरी मित्रांनो, अनधिकृत खत विक्रेते बाजारात तुमची होऊ शकते फसवणूक

लातूर तालुक्यातील नांदगाव शिवारात अनाधिकृतपणे खताची विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कृषि विकास अधिकारी बी.एस. रणदिवे, मोहिम अधिकारी एस.बी. देशमुख, कृषि अधिकारी पंचायत समितीचे एस. एस. शिंदे यांच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने चौकशी केली असता शिवकुमार कुसनुरे हा इसम नांदगाव या गावामध्ये ट्रकद्वारे खते घेऊन येतो व शेतकऱ्यांना विक्री करतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. या इसमाने अधिकृत खत विक्री परवाना नसताना शेतकऱ्यांना कच्च्या पावतीव्दारे खत विक्री केल्याचे आढळले. 
 
विक्री केलेल्या खताचे नाव सिध्दी गोल्ड प्रोम असून उत्पादक कंपनीचे नाव खेतान क्रॉप सायन्स, भरुच व वितरक कंपनीचे नाव ओम साई फर्टिलायझर्स, शिरपूर असे आहे. शिवकुमार कुसनुरे याने विक्रीच्या उद्येशाने ठेवलेल्या ८० खत बॅग साठयास विक्री बंद आदेश देवून तपासणीसाठी खत नमुने घेण्यात आले. अधिकृत खत विक्री परवाना नसलेल्या व्यक्तीने खत विक्री करणे, उत्पादक/वितरक/ विक्रेत्याने खत विक्री करताना कुठलेही बील विहीत नमुन्यात न देणे, अभिलेखे न ठेवणे, उत्पादक/वितरक/ विक्रेत्याने संगनमत करुन शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याने खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ७, ५ व ३५ तसेच भारतीय दंडविधान १८६० चे कलम ४२०, ३४ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ०३ नुसार गुन्हा केला असल्याने शिवकुमार कुसनुरे, ओम साई फर्टिलायझर्स, शिरपूर व खेतान क्रॉप सायन्स, भरुच यांचे विरुध्द एम.आय.डी.सी. लातूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.