शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (07:17 IST)

जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका घटनेनुसार

jejuri
पुणे : जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त निवडीवरून सध्या वाद सुरु असून या पार्श्वभूमीवर धमार्दाय आयुक्त पुणे यांच्या वतीने करण्यात आलेल्या सात विश्वस्तांची निवड घटनेनुसार करण्यात आली आहे. तसेच नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असून, या निवडीमध्ये सर्वसमावेशक व उच्चविद्याविभूषित लोकांना पसंती देण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवस्थान जेजुरी च्या नवनियुक्त सात विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
विश्वस्तांपैकी अध्यक्ष पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर हे मूळ जेजुरी गावचे रहिवासी आहेत. अ‍ॅड. विश्वास पानसे व अभिजीत देवकाते हे जेजुरी पंचक्रोशीतील निवासी आहेत. अ‍ॅड. पांडुरंग थोरवे हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनिल सौंदडे हे उद्योगपती व उत्तम व्यवस्थापन करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही विश्वस्ताला न्यायालयाने आज पर्यंत दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही. तसेच, सदर नियुक्तीच्या वेळी कोणत्याही शिफारस पत्राचा वापर करण्यात आलेला नाही. किंबहुना माननीय सह धर्मादाय आयुक्त यांनी कोणाचाही दबावाला बळी पडून किंवा शिफारस पत्राच्या आधारे सदर नियुक्त्या केल्या नाहीत, हे निकालातून स्पष्ट आहे. आंदोलनातील काही व्यक्ती खोटी माहिती पसरवत आहेत.
 
त्याचप्रमाणे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातील, त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही. सन २०१२ च्या घटना दुरुस्ती मध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशन चा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा, असे स्पष्ट नमूद आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor