शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:32 IST)

तर रक्त पेढ्यांवर कारवाई होणार, एसबीटीसीचा निर्णय

रक्त संकलन, रक्त वितरण, शिल्लक साठा अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेला (एसबीटीसी) न कळवणार्‍या रक्तपेढ्यांवर लवकरच फास आवळण्यात येणार आहे. राज्यातील २५ ते ३० टक्के रक्तपेढ्या परिषदेला कोणत्याही प्रकारची माहिती कळवत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.
 
राज्यामध्ये तब्बल ३४१ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांना दररोज सकाळी १० ते ११ दरम्यान त्यांच्याकडील रक्ताचा साठा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ‘ई – रक्तकोष’ या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून परिषदेसह सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्तसाठा आहे, याची माहिती उपलब्ध होईल आणि त्यांना गरजेच्यावेळी रक्तासाठी धावपळ करावी लागणार नाही. मात्र राज्यातील रक्तपेढ्यांपैकी २५ ते ३० टक्के म्हणजेच जवळपास ९० ते १०० रक्तपेढ्यांकडून रक्त संकलन व साठ्याची माहितीच परिषदेच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात येत नाही. त्यामुळे रक्तसाठ्यासंदर्भातील योग्य माहिती परिषदेला उपलब्ध होत नाही. 
 
रक्तसाठ्यासंदर्भातील माहिती दररोज संकेतस्थळावर अपलोड करण्यासंदर्भातील सूचना परिषदेकडून रक्तपेढ्यांना वारंवार देण्यात येत आहेत. मात्र मुजोर झालेल्या रक्तपेढ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. माहिती अपडेट करण्याबाबत इंटरनेटची समस्या, डेटा इंट्री करणारी व्यक्ती नाही अशी अनेक कारणे रक्तपेढ्यांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या नागरिकाला रक्त पुरवठा करण्यात अडचणी येतात. वारंवार सूचना करूनही रक्तपेढ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर परिषदेने रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर दररोज अपडेट न करणार्‍या रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील सूचना त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केल्या आहे.