मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (14:05 IST)

बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण

ramdas adthavale
मुंबई : निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग रंगणार की महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरविणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. मुंबईतील ग्रैंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या अटी- शर्तीवरच युती होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली भीमशक्ती नसून ती वंचितशक्ती असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. तसेचरामदास आठवले यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा इतिहास देखील सांगितला.
 
रामदास आठवले म्हणाले की, २०११ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी मी बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोधक नाही. माझे बाबा प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे खूप चांगले मित्र होते. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला आहे, असं बाळासाहेब म्हणाले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती महाराष्ट्रात एकत्र आली पाहिजे. त्याशिवाय राज्यात सत्ता मिळणं अशक्य आहे. त्यामुळे याचा विचार करा, अशा पद्धतीचा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. 
 
बाळासाहेबांनी माझ्यासमोर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर मी जवळपास ८-९ महिने महाराष्ट्रातल्या विचारवंतांशी, साहित्यकांशी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. सर्वांनी मला हेच सांगितलं की, राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. तरी वैचारिक काही मतभेद असले, तरी समाजाला न्याय देण्यासाठी युती करण्यास हरकत नाही, असं सगळ्यांनी सांगितल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं. त्यानंतर शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती झाल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor