शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (21:39 IST)

कांदे-भुजबळ वादाची अखेर मुख्यंत्री यांनी घेतली दखल

नाशिकमधल्या कांदे-भुजबळ वादाची अखेर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय कागदपत्रे मागवली आहेत. नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा आरोपही आमदार कांदे यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः या दोघांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आमदार सुहास कांदे यांचा जबाब घेतला. काल सोमवारी अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता या जबाबानंतर अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. कारण आमदार कांदे यांच्याकडे आपल्याविरोधात एकही पुरावा नाही. भुजबळ यांच्याविरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी धमकी दिल्याचे वृत्त पूर्णतः खोटे आहे. माझे कांदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले, पण ते आमच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबाबत होते. धमकीचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी केलेल्या आरोपामुळे मला भावनिक त्रास झाला. प्रतिमा खराब झाली. त्यामुळे मी कांदे यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
कांदे-निकाळजे वादावर पोलीस आयुक्तांच्या चौकशीचा निर्णय दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत प्रशासकीय कागदपत्रे मागवली आहेत. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनाही त्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक न्यायलयीन प्रकरण वगळून घ्या, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा कांदे यांनी दिला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी वारंवार आमदार कांदे यांची पाठराखण केली आहे.