सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (18:27 IST)

आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्ट पासून होणार सुरु

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
 
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणेसंदर्भात आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागातील शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यात येत आहेत.
 
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याप्रमाणे, आश्रमशाळा या निवासी असल्याने पाल्याला शाळेत व वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आणि संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे याबाबत देखील सूचना  देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक-अधीक्षिका आणि गृहपाल यांची आहे. त्याचप्रमाणे अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार व जिल्हा प्रशासनाच्या कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.
 
शाळा सुरु करताना ज्या ग्रामीण भागात किमान एक महिना आधी कोविड रुग्ण आढळलेला नाही अशा ग्रामपंचायत आणि तेथील पालकांशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरु करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. या शाळा सुरु करण्यापूर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतला असणे आवश्यक आहे.  यासोबतच संपूर्ण आश्रमशाळा व वसतिगृहाचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात येवून त्या ठीकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने विविध समित्या गठीत करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था व निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावण्यात याव्यात, असेही प्रसिद्धी पत्रकामार्फत सूचित केले आहे.