मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (17:59 IST)

एकनाथ शिंदेंचे बंड: शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणारे नेते तुम्हाला माहिती आहेत का?

eknath shinde
विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार का? त्यांची नाराजी दूर होणार का? ते भाजपबरोबर जाणार का? अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
 
एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तर पक्षासाठी तो मोठा धक्का असू शकतो. पण याआधीही नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
 
1. राज ठाकरे
उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणं हा केवळ राज्यातल्या राजकारणासाठी नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता.
 
काकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली ती शिवसेनेच्या महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनानं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.
 
27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली. "माझा वाद विठ्ठलाशी नसून विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांशी आहे," हे राज यांचे उद्गार सूचक होते. 9 मार्च 2006 रोजी राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
 
2. नारायण राणे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. सुरुवातीला ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले.
 
1991 साली छगन भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे महसूल मंत्री झाले.
 
युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री बनले.
 
मात्र, याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले. 2005 मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राणे काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते.
 
2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. 2018 मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा विलिनीकरण सोहळा पार पडला.
 
3. भास्कर जाधव
मातोश्रीवर ताटकळत ठेवल्याने अत्यंत भावनाविवश होऊन भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली. त्याच मातोश्रीवर आज 15 वर्षांनंतर भास्कर जाधव पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल झाले आहेत.
 
भास्कर जाधव यांनी हातातल्या घड्याळ्याला जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले आहे. 1982 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेमधून यांच्या राजकारणाला सुरुवात केली. 1992 मध्ये ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1995 आणि 1999 असे दोन वेळा ते चिपळूणमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
 
2004 मध्ये मात्र त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना विविध खात्याची मंत्रिपदं सांभाळली. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळलं. सुनील तटकरे, उदय सामंत यांच्याशी वितुष्ट असल्यामुळे अखेर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
 
4. गणेश नाईक
पनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत युनियन लीडर म्हणून काम करत असताना आक्रमक कामगार नेता म्हणून ते उदयास आले. नवी मुंबईत आपल्या युनियनमुळे ओळख निर्माण करू लागलेल्या नाईकांची सेना नेत्यांशी गाठभेट झाली आणि ते शिवसेनेत दाखल झाले. इथूनच गणेश नाईकांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
 
नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून 1990 साली गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे 1995 साली जिंकले आणि त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. या काळात गणेश नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं. इथेच गणेश नाईक यांच्या शिवसेनेतील नाराजीची ठिणगी पडली.
 
पुढे गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. नंतर 2004 आणि 2009 या दोन्हीवेळा पुन्हा ते जिंकले. मात्र, 2014 साली गणेश नाईकांना भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभूत केलं. गणेश नाईकांनी पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
बेलापूरच्या खाडीकिनारी 301 चौरस मीटरवर बांधलेलं अलिशान 'ग्लास हाऊस' पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आणि नवी मुंबईतील राजकीय क्षेत्रात दोन दशकं आपला दबदबा निर्माण करणाऱ्या गणेश नाईक यांना जोरदार धक्का बसला.
 
5. छगन भुजबळ
मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून गेला होता. हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यानं राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला. या मेहनती तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ.
 
1985मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी, लीलाधर डाके या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबतच छगन भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं. बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती. शिवसेनेने 1989मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली. या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले.
 
1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यांचं 'लखोबा लोखंडे' असं नामकरण केलं.
 
पुढे 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.
 
2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. त्यांना मार्च 2016मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नाही.
 
तुरुंगवास भोगल्यानंतर भुजबळ यांनी राजकारणात पुनरागमन केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत.
 
6. संजय निरुपम
'जनसत्ता' वर्तमानपत्रात 5 वर्षं काम केल्यानंतर संजय निरुपम यांनी 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रासाठी काम करू लागले. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
शिवसेनेने निरुपम यांना राज्यसभेचे खासदार म्हणून पाठवलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 ते 2014 कालावधीत त्यांनी मुंबई उत्तर मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही काम पाहिलं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
 
7. बाळा नांदगावकर
1995 मध्ये मुंबईतल्या माझगाव इथून बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले. 1999 आणि त्यानंतर 2004 मध्येही ते निवडून आले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळा नांदगावकर यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
 
2009मध्ये मनसेच्या तिकिटावरून ते शिवडीच्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. 2014 मध्ये मात्र त्यांना पराभावला सामोरं जावं लागलं.
 
8. सुरेश प्रभू
शिवसेनेचा अभ्यासू चेहरा अशी सुरेश प्रभूंची ओळख होती. 11 जुलै 1953 रोजी जन्मलेल्या सुरेश प्रभूंचं राजकीय आयुष्य अवघं 26 वर्षांचं आहे.
 
राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. राजापूर मतदारसंघातून 1996 साली पहिल्यांदा सुरेश प्रभू खासदार झाले. 1996 साली सुरेश प्रभू केंद्रीय उद्योगमंत्री झाले, 1998 साली पर्यावरणमंत्री झाले आणि नंतर 1999 साली ऊर्जामंत्री झाले. 20 ऑगस्ट 2002 रोजी सुरेश प्रभूंनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.
 
मात्र, वाजपेयींना सुरेश प्रभूंचं महत्त्व कळलं होतं आणि त्यांनी सुरेश प्रभूंकडे 2002 साली राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाचं प्रमुखपद दिलं. 1996 ते 2009 या काळात सलग चारवेळा लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले. संसदेच्या पब्लिक अकाऊंट कमिटीपासून विविध देशांसोबतच्या पार्लमेंटरी फोरमच्या सदस्यांपर्यंत ते कार्यरत राहिले.
 
2009-10 नंतर मात्र सुरेश प्रभू राजकारणातून काहीसे दूर गेले. शिवसेना त्यांनी अधिकृतपणे सोडली नव्हती.
 
2014मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने प्रभू यांना मंत्रिपद दिलं. 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत पहिले तीन वर्षे रेल्वेमंत्री, नंतर वाणिज्य आणि नागरी विमान वाहतूक अशी मंत्रिपदं त्यांनी सांभाळली.
 
2019 साली केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी यांच्या या नव्या मंत्रिमंडळात मात्र सुरेश प्रभूंना स्थान मिळालं नाही. त्यांना भाजपनं आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं होतं. मात्र, मंत्रि‍पदी वर्णी लागली नाही. 2 फेब्रुवारी 2022 रोजी सुरेश प्रभूंनी राजकारणातून निवृत्ती घेतली.
 
9. तुकाराम रेंगे पाटील
 
शिवसेनेचे परभणी मतदार संघाचे आमदार आणि नंतर शिवसेनेच्याच तिकिटाहून लोकसभेत गेलेले तुकाराम रेंगे पाटील यांनी देखील शिवसेनेला नंतर जय महाराष्ट्र केला होता. 2008 साली लोकसभेत मनमोहन सिंग यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता.
 
या ठरावावेळी शिवसेनेनी मनमोहन सिंग यांच्याविरोधात मतदान करण्याचे आदेश दिले होते पण तुकाराम रेंगे पाटील हे मतदानाला अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेनी त्यांची हकालपट्टी केली होती. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे लढले होते पण त्यांचा शिवसेनेचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव झाला होता.
 
10. कालिदास कोळंबकर
शिवसेनेच्या मुंबईतील महत्त्वपूर्ण नेत्यांपैकी एक असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
वडाळा मतदारसंघातून ते 2009 आणि 2014 मध्ये निवडून आले. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कोळंबकर यांनी 2019 मध्ये वडाळाच मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्याची किमया साधली.
 
11. विजय वडेट्टीवार
2004 मध्ये चिमूर मतदारसंघातून निवडून आले. पाच वर्षांनंतर वडेवट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
ओबीसी समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध वडेवट्टीवार यांचा काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये समावेश होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वडेवट्टीवार यांच्याकडे ओबीसी, आपात्कालीन व्यवस्थापन, भूकंपन पुनर्वसन, समाजल्याण अशा खात्यांची जबाबदारी आहे.
 
12. राजन तेली
राजन तेली हे सुद्धा तळकोकणातले शिवसेनेतील महत्त्वाचे नेते होते. राजन तेली एकेकाळी नारायण राणे यांचे एकदम जवळचे नेते मानले जात. ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतही निवडून गेले होते.
 
राणे यांनी शिवसेना सोडल्यावर तेली यांनीही शिवसेनेला रामराम केला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2006 साली ते विधानपरिषदेत निवडून गेले. त्यानंतर ते काही काळासाठी राष्ट्रवादीत गेले.
 
त्यानंतर भाजपाकडून दीपक केसरकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये त्यांनी केसरकरांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. सध्या राजन तेली सिंधुदुर्गचे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत.
 
13. प्रवीण दरेकर
 
मुंबै बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी दरेकर यांची राजकीय कारकीर्द झाकोळली पण त्यांचा शिवसेना, मनसे आणि भाजप हा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांचे विश्वासू साथीदार असलेल्या प्रवीण यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा गाठली.
 
2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जुन्या नेत्यांना बाजूला सारून दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. 2019 मध्ये त्यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दरेकर यांनी बाजी मारली.