बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (09:08 IST)

जगात देखणी असणाऱ्या लेखणीवर निर्बंध लादू नका – भुजबळ

मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उदघाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उदघाटक विश्वास पाटील, डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, शुभांगीणीराजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, हेमंत टकले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील,  संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की,  महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आज मी ज्येष्ठ मंत्री म्हणून सहभागी असलो तरी नाशिक आणि या परिसराने मला घडविलेले आहे. मी स्वतः लेखक नाही पण वाचक जरूर आहे. तमाम मराठी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपले स्वागत करण्यासाठी उभा आहे. ग्रंथकार सभेची स्थापना आपले निफाडचे न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे दोघेही नाशिकमध्ये काही काळ न्यायदानाचे काम करीत होते. ग्रंथकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या ग्रंथकार सभेचे रूपांतर आज साहित्य संमेलनात झाले आहे. महाराष्ट्राचा हा महाउत्सव अखिल भारतीय पातळीवर साजरा केला जात असतो. आपण या घटनेचे साक्षीदार आहोत याचा मला आनंद वाटतो.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये १९४२ मध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन संपन्न झाले. ते संमेलन चित्रमंदिर सारख्या थिएटरमध्ये नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी भरविले होते. त्याचे स्वागताध्यक्ष वामनराव पुरोहित हे नटश्रेष्ठ शिक्षक होते. पुढील काळात माझे सहकारी डॉ. वसंतराव पवार यांनी २००५ मध्ये ७८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत घेतले. त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध दलित लेखक प्रा. केशव मेश्राम होते. त्या संमेलनाच्या आयोजनात कार्याध्यक्ष म्हणून विनायकदादा पाटील यांचा सहभाग होता. हे तिघेही आज आपल्यात नाहीत याचे दु:ख वाटते.  पहिल्या दोन संमेलनात सहा दशकाचे अंतर पडलेले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा-सोळा वर्षात कुसुमाग्रज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे. लोकहितवादी मंडळ या संस्थेची स्थापना वि. वा. शिरवाडकर तथा आपल्या कुसुमाग्रजांनी सात दशकापूर्वी केली. लोकहितवादी मंडळ नाटक, संगीत या परफॉर्मिंग आर्ट विभागात काम करीत असते.