शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (16:09 IST)

एकनाथ शिंदे : 'महाराष्ट्राच्या विकासाबाबत नरेंद्र मोदींचं व्हिजन समजून घेणार'

devendra fadnavis eaknath shinde
दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपस्थित होते.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत.
 
हे सरकार लोकांचं आहे. लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आता पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासात त्यांचं व्हिजन आम्ही समजून घेणार आहोत.
 
दिल्ली दौऱ्यात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुषार मेहता यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रश्नच नाही. काही जण लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असं शिंदे म्हणाले.
 
बंड केलेले आमदार पैशांच्या मागे गेले नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराने ते आमच्यासोबत आले आहेत. आम्हाला 164 आमदारांचं समर्थन आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रश्न नाही, असंही त्यांनी म्हटलं.
 
शिंदे-फडणवीस यांची राष्ट्रपतींशी भेट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
 
आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना विठोबा-रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली.
 
महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून एकनाथ शिंदे राष्ट्रपतींच्या भेटीला गेले.
 
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
 
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ शिंह यांचीही भेट घेणार आहेत.
 
आज दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय माहिती देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
 
या तिन्ही नेत्यांमधील बैठक रात्री उशिरापर्यंत जवळपास चार तास सुरू झाली. पावणेदहाला ही बैठक सुरू झाली आणि रात्री दोन वाजता ही बैठक संपली.
 
शाहांसोबतच्या बैठकीचा तपशील अजूनही कळू शकलेला नाही. मात्र, खातेवाटप आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.