शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (08:14 IST)

आखाती देशामध्ये ‘महानंद घी’ निर्यातीला सुरुवात

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महानंद घी’ आखाती देशामध्ये निर्यात करण्याचा आरंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते, उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या, व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील- तसेच दूध महासंघाचे पदाधिकारी व अधिकारी तसेच  प्रशांत पवार, प्रवीण सांगळी व प्रवीण पवार उपस्थित होते.
 
सोहळ्याच्या निमित्ताने महापौर पेडणेकर यांनी महानंद दुग्धशाळा आणि मे. पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडीया लि. यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुंबई महापालिकेअंतर्गत महानंदसाठी शक्य ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
महानंद दुग्धशाळेचे “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्यात येत असून ही बाब महानंद दुग्धशाळा व दूध महासंघासाठी सुवर्ण मानबिंदू आहे. महानंद दुग्धशाळेचे “घी” आखाती देशामध्ये निर्यात करण्यासाठी मे. पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडीया लि. ह्यांना प्राधिकृत निर्यातदार संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
महानंद दुग्धशाळेची स्थापना दि. १८ ऑगस्ट १९८३ रोजी शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली. दूध महासंघाचे ८५ तालुका/जिल्हा सभासद असून दूध संघाचे सभासद सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत.  राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी दूध महासंघ जोडलेला आहे. दूध महासंघाचे दुध व दुग्धजन्य पदार्थ हे ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस उतरलेले आहे. श्रीखंड, आम्रखंड व पनीर इ. मध्ये दूध महासंघाने इतरही अनेक दुग्धपदार्थांची वाढ करून लस्सी, छास, सुगंधीत दूध, तूप, ताक व दही इ. दुग्धपदार्थांचा समावेश करून वैविध्य आणले. महानंदच्या सर्व दुग्धपदार्थांचा दर्जा अत्यंत उत्तम असल्यामुळे ग्राहकांनी या दुग्धपदार्थाना नेहमीच पसंती दिलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.