सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (20:55 IST)

रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी मुलगी म्हणते, 'चित्रा वाघ यांनीच दबाव टाकला'

Chitra Wagh
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते पण हे आरोप आपण भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या दबावातून केल्याचं या तरुणीने सांगितल्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
 
"पीडित मुलगी असं का बोलतेय मला माहिती नाही पण मी सर्वतोपरी चौकशीसाठी तयार आहे," असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
 
22 वर्षीय पीडितेने शिवसेना उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या पीडितेला मदत करत तिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुढाकार घेतला होता पण आता या प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे.
 
लैंगिक अत्याचाराचे आरोप रघुनाथ कुचिक यांनी फेटाळले आहेत.
 
काय आहे प्रकरण?
प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध केल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता. गरोदर राहिल्यानंतर संमती नसताना गर्भपात करून तसंच याबद्दल कोणाला काही सांगितल्यास तुला मारून टाकीन अशी धमकी दिल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं होतं.
 
तब्येत ठीक नसताना समजुतीच्या करारनाम्यावर सही करून घेतली आहे म्हणून नोंद करण्यात आली आहे. आरोपी म्हणून पीडित मुलीने रघुनाथ बबनराव कुचिक (राहणार-येरवडा) यांचं नाव घेतलं होतं.
"ही घटना घडल्यानंतर रघुनाथ कुचिक यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी राजकीय षड्यंत्र करून माझ्यावर खटला दाखल केला आहे. जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्याबाबत तपास यंत्रणा व्यवस्थित तपास करेल, तपास यंत्रणेला लागणारी सर्व मदत मी करेल," असं ते म्हणाले होते.
 
पीडितेने दाखल केलेल्या केसच्या अनुषंगाने तपास सुरू आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
 
रघुनाथ कुचिक यांना अटक का झाली नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता.
 
पीडित मुलगी काय म्हणाली होती?
आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला वाघ यांनीच भाग पाडले, असाही आरोप पीडित तरुणीने केला असून सादर केलेले मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे देखील तरुणीने म्हटले आहे.
महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणले, असा पीडितेचा आरोप आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पीडित तरुणीने केला आहे. त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा आरोपही या पीडित तरूणीने केला आहे.
 
राज्य महिला आयोगाने काय म्हटले?
 
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
"रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास काल प्राप्त झाला असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत," असं ट्वीट चाकणकर यांनी केलं होतं.
पीडितेनं आपला जबाब बदलल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
"शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच. काही दिवसांपूर्वी पीडितेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, माझी संपूर्ण वैद्यकीय चाचणी करावी अशी मागणी तिने केली होती. त्यानुसार पोलोसांना निर्देश देऊन तिची मेडिकल तपासणी करण्यात आली होती. ज्या ज्या वेळेस तिने मदत मागितली तेव्हा तिला मदत केली होती. काही व्यक्तींनी राजकीय हव्यासापोटी एका युवतीचं आयुष्य त्यांनी उध्वस्त केलं आहे," असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
 
त्या पुढे म्हणाल्या, "आज पीडितेने याबाबत खुलासा केला आहे. काही कालावधी पूर्वी त्या पीडितेने फोन करून तिने भेटून काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. तिची मी भेट घेईन पण यात काय धागेदोरे आहेत, कोणी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला बदनाम करत असेल एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."
 
'तिचं पोलीस ऐकत नव्हते तेव्हा आम्ही तिला मदत केली'
 
तरुणीने केलेल्या आरोपांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं, "याबाबतीत मुलीने स्वत: मला पत्र पाठवलं आहे. तिचं पोलीस ऐकत नव्हते त्यावेळी आम्ही तिला मदत केली. तसंच आम्ही त्या पीडितेसाठी जे काही करता येईल ते केलं. या मुलीच्या तक्रारीत सगळ्यांत पहिल्यांदा मुलगी आमच्याकडे आली. मी स्वत:ला संपवते असं ती म्हणत होती. मी तिचं ते पत्र पुण्यातील कमिश्नरला पाठवलं. मात्र, एवढं सगळं करुनही जर ती मी दबाव दिला म्हणत असतील, तर त्या सर्व गोष्टी समोर आणाव्या मी सर्व गोष्टींसाठी तयार आहे. आम्ही तिच्या तब्येतीची काळजीच घेतली आहे आणि तिला मदत केली आहे बाकी काही नाही."
 
"मी काय करतेय, कोणाला ब्लॅकमेल करते हे खोटं आहेच. मात्र, तुम्ही बलात्काऱ्याला पाठीशी घालता," असा आरोपही चित्रा वाघ यांनी साम टीव्हीशी बोलताना विरोधकांवर केला.
 
तसंच, "मी त्या पीडितेला मदत करण्यात माझा कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ नाही, तिला हॉस्पिटलची गरज होती मग तुम्ही का समोर आला नाही. मी कुठेही यायला तयार आहे त्या सर्व तक्रारीवरुन मी तिला साथ द्यायचा प्रयत्न केला आहे सर्व आरोपांची उत्तरं माझ्याकडे आहेत," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
त्या म्हणाल्या, "जिवंत धडधडीत पुरावे असताना गप्प बसणे आमच्या रक्तात नाही. तिने मदत मागितली आम्ही केली. तिला मदत करणे ही चूक असेल तर चित्रा वाघ यांनी ती केली. मी आरोपाला सामोरे जाऊन चौकशीसाठी तयार आहे," असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
 
त्या म्हणाल्या, "पीडित मुलीने दबावातून सुसाईड नोट लिहिली असा आरोप होत आहे, पण चित्रा वाघ सर्व व्हेरीफिकेशनसाठी तयार आहे. ती मुलगी का असे बोलत आहे हे माहित नाही पण मी सर्वतोपरी चौकशीसाठी तयार आहे. मला तिला मदतच करायची होती म्हणून मी केली," असेही त्या म्हणाल्या.
 
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
 
रघुनाथ कुचिक यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
या पीडितेचं आधीच स्टेटमेंट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं हे स्टेटमेंट आहे. तिला कोणीच मदत केली नाही असं दिशाभूल करणारं वातावरण निर्माण केलं गेलं. 25 फेब्रुवारीला त्या पीडितेचा फोन आला होता, फोनवरून मी तिची कैफियत जाणून घेतली. तिने तक्रार दाखल करायची आहे सांगितलं असं विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
 
"पक्ष न पाहता तिला तक्रार दाखल करायची असल्याचं संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या लेडी कॉन्स्टेबल तिला घेऊन गेली आणि त्यांनंतर तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला. ही गोष्ट चित्रा वाघ यांना देखील माहीत आहे. रघुनाथ कुचिक यांनी फोन करून म्हणणं ऐकून घेण्याची विनंती केली परंतु अशा घटनांमध्ये मी पीडितेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आरोपीला भेटलेले नाही आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही म्हणून मी तुम्हालाही भेटणार नाही असं मी त्यांना सांगितलं. राजकीय भांडवलासाठी मुलींचा वापर करणं हे मानवाधिकाराच्या विरुद्ध आहे. आणि संवेदनहीन आहे," असं त्यांनी सांगितलं.