शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (20:57 IST)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनस्तरवर प्रयत्न करणार : भुजबळ

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीस दिलेल्या भेटी दरम्यान ते बोलत होते.
 
भुजबळ म्हणाले, कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे.यासोबतच नाशिक जिल्ह्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी केली असून ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरवा केला असून कांद्यासाठी ३५० रूपये प्रति क्विंटल अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८६५ कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून ते दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यापैकी ४६५ कोटी अनुदान वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यात  ६० टक्के जिल्ह्यातील शेतकरी असून  ४३५ कोटी रूपये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.
 
ते म्हणाले की,पाऊस कमी झाल्यामुळे साहजिकच यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कांद्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच शासनस्तरावर  आणि शेतकरी प्रतिनिधी, कांदा व्यापारी, बाजार समित्यांचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून यात सर्वांच्या समस्या जाणून घेवून योग्य निर्णय घेतला जाईल असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor