बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:30 IST)

हाफकिन इन्स्टिट्यूटने कोविडसाठीची लस निर्मिती करावी : मुख्यमंत्री

हाफकिन इन्स्टिट्यूटचे मुख्य काम हे विविध आजारांवरील लस निर्मिती आणि संशोधन करणे हेच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक असून यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य राज्यशासनामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. 
 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्यदायी उत्पादनाची निर्मिती व पुरवठा करणे यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिन इन्स्टिट्यूटने औषध निर्माणाबरोबरच कोविडसाठीची लस निर्मिती करण्याबरोबरच संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी आयसीएमआर आणि भारत बायोटेक कडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठीही प्रयत्न करण्यात यावा. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेत अद्ययावत व्हॅसिन रिसर्च सेंटर स्थापन करण्यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.
 
मानव सेवेस समर्पित असणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन आणि जीव औषध निर्माणात योगदान दिले आहे. हाफकिन संस्था येत्या काळात नावारुपाला आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने हाफकिन इन्स्टिट्यूटमार्फत येत्या 5 वर्षात 5 प्रकल्पांसाठी 1,100 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. हे पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा पूर्ण पाठिंबा असून येत्या 15 दिवसात याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यामध्ये नेमका कोणता प्रकल्प प्रथम हाती घेतला जाऊन त्याची आवश्यकता, कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे, यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे नियोजन तसेच राज्य शासनाकडून आवश्यक असणारा निधी याबाबत या आराखड्यामध्ये संपूर्ण तपशील असावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
 
भारताला पोलिओ मुक्त करण्यात मोठा वाटा देणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने गेल्या सहा महिन्यात जवळपास 28 कोटींहून अधिक लसीची निर्मिती केली आहे ही बाब अभिनंदनीय नक्कीच आहे. मात्र राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणे आवश्यक आहे आणि लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.