मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (08:48 IST)

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून लाखोंची रोकड गायब

भारत सरकारच्या नाशिकरोड येथील जेलरोड भागात असलेल्या चलार्थपत्र मुद्रणालयातून सुमारे पाच लाखांची रोकड चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार चार महिन्यानंतर उजेडात आला आहे. पाचशेच्या चलनी नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे मुद्रणालय व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला जात होता. तसेच अंतर्गत चौकशी समिती गठीत करत तपास केला जात होता. दरम्यान, रोकड मिळून न आल्यामुळे अखेर चौकशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सुत्रे फिरविली. पाचशेच्या नोटांचे बंडलमध्ये पाच लाखांची रोकड गहाळ झाली की चोरी याचा तपास सुरु केला. दरम्यान, बहुतांश कर्मचाऱ्यांची चौकशीदेखील करण्यातआली. तसेच जाबजबाबही घेतले गेले. इमारतीच्या आवारात नोटांच्या बंडलचा शोधही घेतला गेला; मात्र कोठेही नोटांचे बंडल मिळून आले नाही.
 
दरम्यान, गेली पाच महिने मुद्रणालयाच्या फॅक्ट फाइन्डींग समितीकडून याबाबत तपास केला जात होता. या समितीने सर्व चौकशी पुर्ण करत त्यांचा चौकशी अहवाल उपनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा सादर केला. तसेच मुद्रणालयातून पाच लाखांच्या रोकडचा अपहाराबद्दल तक्रार अर्जही दिला असून यासंदर्भात चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. 
 
 
“करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी केली आहे. फॅक्ट फाईन्डींग कमिटीकडून मागील काही महिन्यांपासून गहाळ झालेल्या पाच लाखांच्या रोकडचा शोध घेतला जात आहे. कर्मचाऱ्यांचे जबाबही या समितीने नोंदविले आहे. रोकडचा तपास लागलेला नाही. समितीचा चौकशी अहवाल आणि तक्रार अर्जावरुन उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पुढील तपासाला दिशा दिली जात आहे.” -विजय खरात, पोलीस उपायुक्त, नाशिक