शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (22:49 IST)

मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा अतिरेकी वापर : शरद पवार

बारामती : एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. पण अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तिंच्या घरी छापे टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
 
बारामतीतील गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. छापेमारीनंतर चौकशी अद्याप सुरु आहे, चौकशीनंतर सविस्तर बोलता येईल असं सांगून पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात शेतकऱयांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही.
 
यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेवून आरोप करतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज कारवाई करण्यासाठी पुढे येतात ही आक्षेपार्ह बाब असल्याचं पवार म्हणाले.