बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (12:23 IST)

रिक्षात जात असलेल्या आईसह 8 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

परभणी जिल्ह्यातील रहाटी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे एका भीषण अपघातात आईसह 8 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
 
ऑटो रिक्षातून कुटुंबासह परभणीच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात घडला ज्यात आईसह 8 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना घडताच जवळपासच्या लोकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण प्राथमिक तपासणी करत डॉक्टरांनी बाळासह आईला मृत घोषित केलं आहे. तर जखमी मुंजाजी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पद्मिनी मुंजाजी शिंदे असं मृत पावलेल्या आईचं नाव तर वैभव मुंजाजी शिंदे असं आठ महिन्याच्या बाळाचं नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील रहिवासी असलेले मुंजाजी शिदे आपल्या पत्नी आणि 8 महिन्याच्या बाळाला घेऊन परभणीच्या दिशेनं जात होते. दरम्यान वसमत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर रहाटीजवळ रस्ता नादुरुस्त असून अनेक खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवत असताना एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे ऑटो रिक्षा उलटला आणि यातच आईसह आठ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. 
 
ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.