शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (07:36 IST)

महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावात जमिनीतून येत आहेत गूढ आवाज

महाडच्या कसबे शिवथर गावात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची माहिती समोर आली आहे. भूगर्भातून आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या आवाजांचे गूढ शोधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, एनडीआरएफ टीमने गावाला भेट दिली आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला असून सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आला आहे. तसंच, भूगर्भ तज्ञांची टीम सोमवारी गावाला भेट देणार आहे.महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठ मोठे आवाज येत होते.

त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या गावात 70 ते 80 घरं आहेत. 4 ऑगस्ट रोजी दिवसभर अधून मधून आवाज येत होते. तर, त्याच रात्री जमिनीतून मोठा आवाज झाला. भूगर्भातून आलेल्या आवाजामुळं नागरिक घाबरले होते. त्यांनंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली.
 
महाडचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीम सह गावाला भेट दिली. प्रशासनाच्या पथकाने दिवसभर पाहणी केली. मात्र त्यांना यामागची कारणे अद्याप समजू शकली नाहीत. या टीमने ग्रामस्थांना धीर देत सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, आता भूगर्भ तज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात येणार आहे. ही टीम गावाला भेट देऊन या आवाजामागच्या कारणांचा शोध घेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor