रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (22:04 IST)

नाशिक : अन 'त्या' कोवळ्या जिवाने मृत्यूशी लढाई जिंकली

baby legs
तो अवघा दीड वर्षांचा…दिवसभर खेळून दमलेल्या या चिमुकल्यास रात्री अचानक मण्यार या विषारी सापाने दंश केला. कोवळ्या जीवावर जहाल सापाचा हल्ला झाल्याने चोवीस तास त्या कोवळ्या जीवाची मृत्यूशी झुंज सुरू होती. एकीकडे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न तर दुसरीकडे कुटुंबाने केलेला देवाचा धावा कामी आला, अन त्या कोवळ्या जिवाने मृत्यूशी लढाई जिंकली.
 
वंजारवाडी (ता.नांदगाव) येथील यादव कारभारी पवार यांच्या कुटुंबातली ही घटना आहे. यात यादव कारभारी पवार वंजारवाडी येथे हे शेतात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा योगेश आणि स्नुषा पूजा या दाम्पत्यास कान्हा नावाचा गोंडस दीड वर्षांचा मुलगा आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पूजाने कान्हास झोपी लावले. दिवसभर शेतात काम करून पवार कुटुंबीय देखील लवकर झोपी गेले.
 
रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक कान्हा मोठ्याने ओरडून रडू लागला. पूजा हिने त्यास जवळ घेतले असता तिला कान्हाचा उजव्या हाताचा अंगठा सापाच्या तोंडात असल्याचे दिसले. ते दृश्य बघून भेदरलेली पूजा जोरात किंचाळली. त्यामुळे सर्व कुटुंब जागे झाले.
 
कान्हाला सर्पदंश झाल्याचे लक्षात त्यास तातडीने मनमाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. परंतु, (दि.३) दुपारी तीन वाजता कान्हाची शुद्ध हरपली. प्रकृती क्षणक्षणाला खालवत असल्यामुळे पवार कुटुंबाची भीती वाढली. त्यामुळे कान्हास नाशिक येथील साफल्य बालरुग्णालय येथे दाखल केले. कृत्रिम श्वासोच्छ्वासावर असलेल्या कान्हावर डॉ. अभिजित सांगळे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. या कालावधीत अँटी स्नेक बाईटचे सत्तावीस डोस देण्यात आले. अखेर  त्याला शुद्ध आली. त्यानंतर देव पाण्यात ठेवलेल्या पवार कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.
मण्यार या भारतातील सर्वांत विषारी सापाने दंश केल्यानंतर वाचण्याची शक्यता कमी असते. 

Edited By - Ratnadeep Ranshoor