मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By BBC|
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (11:51 IST)

अजगर अख्खा माणूस कसा गिळू गिळतो?

Python
इंडोनेशियाच्या जांबी प्रदेशात एका अजगराने महिलेला अख्खं गिळलं. तिचा मृतदेह या अजगराच्या पोटात सापडल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत.
 
रबराचा चीक गोळा करणारी जेराह नावाची ही पन्नाशीची महिला रविवारी, 23 ऑक्टोबरला सकाळी रबराच्या बागेत गेली होती. मात्र ती परत आलीच नाही.
 
ती हरवली असल्याचं रविवारी संध्याकाळी कळलं, आणि तिच्या शोधासाठी लोक पाठवले गेले. पण त्या दिवशी ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना एक भलामोठा अजगर दिसला, ज्याचं पोट फुगलं होतं आणि तो सुस्तावून पडला होता.
 
स्थानिकांनी या अजगराला मारून टाकलं आणि त्याच्या पोटात या महिलेचा मृतदेह आढळला.
 
जांबीचे पोलीस अधिकारी एकेपी हरेखा यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं की "महिलेचा मृतदेह अजगराच्या पोटात सापडला. तिचं शरीर जवळपास जसंच्या तसं होतं."
 
या महिलेच्या नवऱ्याला रविवारी संध्याकाळी तिचे कपडे आणि ती वापरत असलेली हत्यारं रबराच्या बागेजवळ सापडली होती. म्हणूनच त्याने तिला शोधण्यासाठी गावकऱ्यांची मदत घेतली.
 
हा अजगर जवळपास 16 फूट लांब होता.
 
अशा प्रकारच्या घटना दुर्मिळ असल्या तरी इंडोनेशियात अख्खा माणूस अजगराने गिळायची ही पहिलीच वेळ नाहीये. 2017 आणि 2018 मध्ये अशाच प्रकरच्या घटना घडल्या होत्या.
 
अजगर हल्ला कसा करतो?
गेल्या पाच वर्षांमध्ये इंडोनेशियात माणसांना मारणारे अजगर हे विशिष्ट प्रजातीचे आहेत, जे मुख्यत्वे दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आढळतात.
 
ते 10 मीटर लांबीपर्यंत (जवळपास 32 फूट) वाढतात आणि अतिशय शक्तिशाली असतात.
 
अजगर दबा धरून हल्ला करतो. तो आपल्या भक्ष्याभोवती स्वतःला गुंडाळतो आणि मग आपली पकड अधिकाधिक घट्ट करत भक्ष्याला आवळत राहतो. अशारीतीने भक्ष्य श्वास कोंडून किंवा कार्डिअक अरेस्टमुळे काही मिनिटांतच मृत्युमुखी पडतं.
 
अजगर त्याचं खाणं अख्खंच्या अख्खं गिळतो. अजगराचा जबडा अतिशय लवचिक अशा अस्थिरज्जूंनी जोडलेला असतो आणि मोठ्ठं भक्ष्य गिळण्यासाठी जबडा कितीही ताणू शकतो.
 
अजगराला माणसं सहजासहजी गिळता येत नाहीत. माणसाला गिळण्यांत येणारा सर्वांत मोठा अडथला म्हणजे आपली खांद्याची हाडं. ती सहजासहजी वाकत नाहीत, असं वाइल्डलाइफ रिझर्व्ह सिंगापूरमधील संवर्धन आणि संशोधन अधिकारी मेरी रुथ लो यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
 
ते इतर मोठे प्राणी खातात का?
"अजगर हे मुख्यत्वे सस्तन प्राणीच खातात," मेरी रुथ यांनी सांगितलं. फार क्वचित ते सरपटणारे प्राणी खातात, ज्यामध्ये मगरीचाही समावेश असतो.
 
"मुख्यत्वे ते उंदीर आणि इतर छोटे प्राणी खातात. पण जेव्हा ते एका विशिष्ट आकारापर्यंत पोहोचतात, तेव्हा मग उंदीर आणि छोट्या प्राण्यांनी त्यांचं पोट भरत नाही. कारण त्यांना त्यातून पुरेशा कॅलरीच मिळत नाहीत."
 
त्यामुळे त्यांच्या भक्ष्याचा आकार हळूहळू वाढत जातो, असं मेरी रुथ सांगतात. कधीकधी तर ते गाय किंवा डुकरासारखा मोठा प्राणीही फस्त करतात.
 
पण कधीकधी अजगराचा आपल्या भक्ष्याबद्दलचा अंदाज चुकू शकतो. 2005 साली फ्लोरिडामध्ये एका अजगराने सुसरीसारखा एक अख्खा प्राणी गिळला. पण तो गिळताना त्या अजगराचं पोटच फाटलं आणि दोन्ही प्राणी मेले.
 
हे शिकारी आपल्या सावजाच्या बाबतीत 'चोखंदळ' असतात. जोपर्यंत त्यांना योग्य, पुरेसं मोठ्ठं असं सावज सापडत नाही, तोपर्यंत ते बराच काळापर्यंत अत्यंत कमी आहारावरही राहू शकतात.
 
अजगरानं माणूस खाण्याची पहिलीच वेळ?
नाही, इंडोनेशियात गेल्या पाच वर्षांत अशाच दोन घटना घडल्या होत्या.
 
2018 साली इंडोनेशियातील सुलावेसी प्रांतातील एक महिला तिच्या बागेतील भाजीपाल्याची मशागत करायला गेली आणि गायबच झाली.
 
तिचे सँडल्स आणि बागकामाची कात्री तेवढी सापडली. या गोष्टी जिथे सापडल्या तिथपासून अवघ्या 30 मीटर अंतरावर एक अजगर पसरला होता... त्याचं पोट चांगलंच फुगलं होतं.
 
"आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अजगरानेच या महिलेला गिळलं असावं असा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला मारलं आणि बागेच्या बाहेर आणलं," स्थानिक पोलिस प्रमुख हाम्का यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं होतं.
 
अजगराचं पोट चिरलं आणि आतमध्ये त्या महिलेचा मृतदेह आढळला असंही त्यांनी सांगितलेलं.
 
याच सुलावेसी प्रांतात मार्च 2017 मध्येही जवळपास वीस फुटी अजगराने एका शेतकऱ्याला गिळल्याची घटना घडली होती. त्याच वर्षी इंडोनेशियाच्याच सुमात्रा प्रांतामध्ये एका माणसावर अजगराने हल्ला केला होता. हा अजगरही वीस ते 22 फूट लांबीचा होता. पण त्या मनुष्याने अजगराशी लढा दिला. यामध्ये तो बराच जखमीही झालेला.
 
त्याच्याही जवळपास 15 वर्षं आधी दक्षिण आफ्रिकेत एका अजगराने दहा वर्षांच्या एका लहान मुलाला गिळलं होतं.
 
इंडोनेशियामधील ब्रविजया विद्यापीठातील सर्पतज्ज्ञ निया कुर्नियावन यांनी मागे एकदा बीबीसी इंडोनेशियाशी बोलताना म्हटलं होतं की, अजगर हे कंपनं, मोठा आवाज तसंच दिव्यातून येणारा प्रकाश याबाबत संवेदनशील असतात. त्यामुळे सहसा ते मानवी वसाहतींमध्ये जाणं टाळतात.