समीर वानखेडे यांच्या सत्कारावर आक्षेप, सरकारकडे केली कारवाईची मागणी
एनसबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान या संघटनेने सत्कार केला. मात्र, यावर आक्षेप घेण्यात आला असून राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. आरपीआयचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी यावर आक्षेप घेत राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे प्रशासनाला आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जात, धर्म, लिंगभेद, वर्णभेद नसतो. समीर वानखेडे हे विशिष्ट धर्मीय आहेत म्हणून कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करणं चुकीचं आहे. महाराषअट्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी विनंती सचिन खरात यांनी केली.
दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ काही हिंदुत्ववादी संघटना समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान या संघटनेनं थेट एनसीबीच्या कार्यालयासमोर समीर वानखेडे यांचा सत्कार केला. तसंच, वानखेडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तानचे नितीन चौगुले म्हणाले. नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करत असून त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना आमचा विरोध आहे. त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत राहू, असंही चौगुले यांनी सांगितलं.