गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (07:28 IST)

नागपुराला ऑक्सिजनचे 5 टँकर्स उपलब्ध होणार

राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरला ऑक्सिजनचे 5 टँकर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन समन्वय घडवून आणला. त्यामुळे आता येत्या 10 दिवसांत दिवसाआड 1 टँकर असे 5 ऑक्सिजन टँकर नागपूरला मिळणार आहेत.
 
देवेंद्र फडणवीस यांनी सिलतरा, रायपूर येथील जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टिल प्लांटचे सह-व्यवस्थापकीय संचालक रमेश जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला. फडणवीसांच्या विनंतीला मान देत त्यांनी ऑक्सिजनचे 5 टँकर्स देण्याची तयारी दर्शविली. यानंतर प्रश्न होता तो ऑक्सिजन नागपूरला आणण्याचा. यासाठी फडणवीसांनी जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही टँकर्स देण्याचे मान्य केले. यानंतर फडणवीस यांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि या दोघांचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून देत लवकर कारवाई करण्याची विनंती केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही तत्काळ कारवाई करू असे सांगितले.