राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  नागपूरमधील काँग्रेस नेते त्रिशरण सहारे यांना खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. कामाठीमधील भू-माफिया रंजीत सफेलकरच्या सोबत झालेला आर्थिक व्यवहार पुढे आणू नये यासाठी विश्वजित किरदत्त यांना एक लाखाची खंडणी मागण्यात आली होती. ती घेताना त्रिशरण सहारे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. 
				  													
						
																							
									  
	 
	सूत्रांच्या माहितीनुसार, कुख्यात रंजीत सफेलकर याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याशी संबंधित प्रकरणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यादरम्यान रंजीत सफेलकरच्या बँक खात्याची देखील चौकशी करण्यात आली. त्याच्या खात्यांच्या चौकशीमध्ये पोलिसांना समजलं की, सुमारे चार वर्षापूर्वी त्याच्या उमरेड रोडवरील टेमसना गावाजवळच्या 15 एकर शेतीची रक्कम सफेलकरच्या बँक खात्यातून राजघराण्यातील सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे.
				  				  
	 
	या बातमीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सहारे यांनी राजघराण्यातील एका सदस्याला रंजीतबरोबरच्या फोटोवरुन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या ब्लॅकमेलिंगला वैतागून या सदस्याने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशीत समोर आले की, बंडू सहारे नावाच्या व्यक्तीने राजघराण्यातील व्यक्तीशी संपर्क साधला होता. तेव्हापासून ते ब्लॅकमेल करत होते. रंजीतसोबत असलेला फोटो छापल्यास बदनामी होईल अशी धमकी देत, फोटो न छापण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	भोसले राजघराण्याशी संबंधित असलेल्या विश्वजित किरदत्त यांच्यासोबत राकेश गुप्ता, ॲड. प्रकाश जयस्वाल आणि दुनेश्वर पेठे यांच्या नावे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा सौदा केला होता. या सौद्यापोटी विश्वजित आणि त्यांच्याशी (राजघराण्यातील) संबंधित व्यक्तींच्या खात्यात लाखोंची रक्कम जमा झाली. ही रक्कम गँगस्टर रणजित सफेलकर याच्या बँक खात्यातून वळती करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. 
				  																								
											
									  
	थेट राजघराण्याला ब्लॅकमेल करण्याचं हे प्रकरण पोलिसांनी गांर्भीर्याने घेतलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचे आरोप लागलेल्या त्रिशरण सहारेला पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून मेयो रुग्णालय चौकातून रंगेहाथ अटक केली. एका काँग्रेस नेत्याला थेट राजघराण्याच्या लोकांना ब्लॅकमेल करण्याच्या या प्रकरणावर सध्या काँग्रेसने मौन साधलं आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने केली.