शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (20:08 IST)

सातत्याने बैठे कामामुळे पाठ व मानेचे विकार वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

सातत्याने बैठे कामामुळे पाठ व मानेचे विकार वाढत असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. सागर महाजन यांनी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमालेच्या अंतीम पुष्पात ’रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंज्युरी’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखानमालेत  भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. सागर महाजन यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जयंत पळसकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. गीतांजली कार्ले, श्री. प्रशांत शिंदे, डॉ. प्रशांत शिवगुंडे आदी अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. सागर महाजन यांनी सांगितले की, तरुण पिढीने सुदृढ जीवन जगण्यासाठी शारीरिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे तरुण पिढीमध्ये सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अश्या अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. संगणक व मोबाईल वापरणाÚयांनी काळजी घ्यावी जेणेकरुन पाठीचे दुखणे, मणक्याचे आजार टाळता येतील.

सर्वांनी नियमित योग्य पध्दतीने शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी उठतांना, चालतांना, झोपतांना, काम करतांना शरीराचा पवित्रा (पोश्चर) नीट राखणे गरजेचे आहे. कार्यालयात किंवा अधिक वेळ बैठेस्थितीत काम करणाÚया प्रत्येक व्यक्तीने दोन तासानंतर शरीराला भौतिकोपचार पध्दतीत दिलेल्या सूचनांचे पालन करुन ताण देणे गरजेचे आहे.
 ते पुढे म्हणाले की, सद्या कंबरदुखी, डोकेदुखी मायग्रेनचे प्रमाण वाढत असून त्यासाठी उत्तम आहार, व्यायाम व प्राणायम करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींना अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.

दैनंदिन जीवन जगतांना सर्वांनी लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करावा, एकाच ठिकाणी दोन तासांपेक्षा जास्त बसून काम करु नये, रोज शक्य तितका व्यायाम करावा, कमीत कमी 10 मिनिटांपासून व्यायामांची सुरुवात करुन 40 ते 45 मिनिटांपर्यंत तो हळूहळू वाढवावा, नियमित पाच किलोमिटर प्रत्येकाने पायी चालणे गरजेचे आहे यामुळे स्नायूंची लवचिकता, ताकद वाढते. मैदानी खेळ, पोहणे, सायकलिंग अशा क्रियांचा जीवनशैलीत समावेश असावा. शरीरात, स्नायूंमध्ये घट्टपणा किंवा वेदना असल्यास भौतिकोपचार तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घ्यावा व नियमित व्यायाम करावा असे त्यांनी सांगितले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor