बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:18 IST)

सचिन सावंतांचा भाजप नेत्यांना टोला नरेंद्र मोदींनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडीओ शेअर

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत भास्कर जाधव यांना माफी मागायला लावली.
 
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यामध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत. तसेच, मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
 
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदींवर टीका करताना डोळा मारला होता. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत राज्याचे मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. विधानसभेत नितीन राऊत यांनी एका विषयासंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढू, नागरिकांना १५-१५ लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाला आक्षेप घेतला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन कधीही दिलच नव्हते, असा दावा फडणवीस यांनी केला. या लक्षवेधीशी पंतप्रधानांचा संबंध नसतानाही तो विषय काढणे हे आम्ही सहन करणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, २०१४ साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते, काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का…, अशा प्रकारे नक्कल करताना त्यांनी अंगविक्षेपही केला.