गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2019 (11:38 IST)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्नेहजा रूपवते यांचा अपघातात मृत्यू

लग्नसोहळ्यास उपस्थिती देऊन मुंबई येथे जात असताना कारचे मागील टायर फुटल्याने कार पलटून झालेल्या अपघातात माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते (वय ६४) यांचा मृत्यू झाला. गाडीचे टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वासुदेव दशरथ माळी (२६) रा.आसोदा यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. स्नेहजा रुपवते या माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या स्नुषा तसेच रावेरचे माजी आ.शिरीष चौधरी यांच्या भगीनी आहेत. माजी आ.शिरिष चौधरी यांची कन्या प्रज्ञा हिचा विवाह सोहळा खिरोदा येथे शनिवारी आयोजित केला होता. या लग्नासाठी प्रा.स्नेहजा रूपवते मुंबई येथुन खिरोदा येथे आल्या होत्या.हा सोहळा आटोपून नातेवाईकांसोबत मुंबईकडे झायलो कार क्र. एम.एच. ४६ पी. ९०५८ ने त्या पाळधीकडून एरंडोलकडे वळण रस्त्यावरून जात असतांना कारचे मागचे दोन्ही टायर फुटल्याने गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने महामार्गावर सात ते आठ वेळा पलटी घेतली.यावेळी एरंडोलकडून जळगावकडे जात असलेली दुचाकी क्रमांक एम.एच. १९ बी.डब्ल्यू. ६८४५ ला कारने धडक दिली. यात वासुदेव दशरथ माळी (२४) तसेच चेतन लक्ष्मण पाटील (२३) आसोदा हे गंभीररित्या जखमी झालेत.
 
दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोन्ही वाहने ५० ते ६० फुटापर्यंत फेकली गेली. रूग्णालयात वासुदेव याचा उपचारात मृत्यू झाला..
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्नेहजा रूपवते महर्षी दयानंद महाविद्यालय वडाळा मुंबई येथुन त्या अध्यापनाचे कार्य करीत होत्या. मुंबई आणि सामाजिक संस्थात कार्यरत होत्या.
 
कुसुमताई चौधरी महिला कल्याणी संस्था तसेच मुंबईतील मलबार हिल येथील बालकल्याणी संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या. जळगावात २००५ मध्ये संपन्न झालेल्या राज्यव्यापी महिला कवयित्री संमेलन कुसुमांजलीच्या त्या मुख्य आयोजक होत्या.नंतर असे संमेलन त्यांनी नगर, कोल्हापूर तसेच औरंगाबाद येथे आयोजित केले होते.स्नेहजा रुपवते या काँग्रेस नेते व बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दिवंगत प्रेमानंद रूपवते (७३) यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात आई सुशीलाबाई, मुंबई उच्च न्यायालयातील संघराज, वैमानिक परित्याग व संग्राम असे तीन भाऊ, बहिणी युगप्रभा बल्लाळ, डॉ. स्मृतिगंधा गायकवाड व डॉ. क्रांती कोळगे, मुली उत्कर्षा व बंधमुक्ता, जावई, मेहुणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.