शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (08:10 IST)

राज्यसभेसाठी संभाजीराजेंना शरद पवारांचा पाठिंबा, विजयाचा मार्ग मोकळा?

sharad pawar
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वपक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते.
 
याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला आहे. नांदेड येथील एका पत्रकार परिषदेत पवार यांनी ही घोषणा केली. यामुळे संभाजीराजे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
मात्र, आता भाजपकडून यासंबंधी काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 
यासाठी संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.
 
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केलेला आहे.यावर बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात.
 
याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात.
 
संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात. शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.