बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: दर्यापूर (अमरावती) , शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (12:47 IST)

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' : अशोक चव्हाण

मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असून, ते राज्यात म्हणून फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' म्हणून ओळखले जातात. राज्यातील व देशातील जनतेने त्यांचा हा गोरखधंदा उद्‌ध्वस्त करीत काँग्रेसला सत्तेत आणावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले. स्थानिक तरुण उत्साही मंडळाच्या मैदानात आयोजित जनसंघर्ष यात्रेदरम्यान जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. 
 
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाने उद्‌ध्वस्त झालेल्या व्यापारी व शेतकर्‍यांसाठी या सरकारकडे काहीच नाही. भिकारी झालेले भाजप सरकार सर्वसामान्यांना काहीच देऊ शकत नाही. देशात मुली व महिला असुरक्षित असून 'भाजप भगाओ- बेटी बचाओ' असा नारा त्यांनी दिला. राज्यातील 89 हजार शेतकर्‍यांना 38 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. परंतु, एक वर्ष पूर्ण होऊनही कर्जमाफी देण्यात आली नाही. याआधी काँग्रेसने शेतकर्‍यांकडून कोणताही अर्ज भरून न घेता एका निर्णयाने सरसकट कर्जमाफी दिली होती. तत्पूर्वी, मान्यवरांची मूर्तिजापूर ते उत्साही मंडळाच्या मैदानापर्यंत संविधान बचाव दिंडी काढण्यात आली. यासह युवक काँग्रेसच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅलीसुद्धा काढण्यात आली. दर्यापूर काँग्रेसच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.