उभ्या एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
बीड आगारात उभ्या असलेल्या एसटी बस मध्ये एका वृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने, एकच खळबळ माजली आहे. ६० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. बसमधील लोखंडी दांड्याला दोरी बांधून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव निवृत्ती आबुज (रा. बीड) असल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केलेला व्यक्ती कर्मचारी नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बीड एसटी बसस्थानकात तीन महिन्यांपासून संप सुरू असल्याने काही बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. मंगळवारी दुपारी स्थानकात उभ्या असलेल्या (क्र. एमएच १४ बीटी २२३७) या गाडीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह लटकल्याचे काहींना दिसून आले. संप सुरू असल्यामुळे एखाद्या सहकाऱ्यानेच असे पाऊल उचलले की काय? अशी शंका आल्याने एसटीचे इतर कर्मचारी आणि बघ्यांची गर्दी जमली. यानंतर पोलिसांना पाचारण केल्यानंतर एसटीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शाहुनगर भागातील निवृत्ती भागुजी आबुज या व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.