शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (16:25 IST)

पत्नीला वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडले हे आजोबा

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि नाशिक परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत.अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत घुसलेले बिबटे अनेकदा लहान मुलं, पाळीव प्राण्यांना आपलं शिकार बनवत आहेत.त्यामुळे शेतात आणि जंगल परिसरात राहणारे नागरिक धास्तावले आहेत.अशात नाशिक जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पारध्याची मेट याठिकाणी एक थरारक घटना घडली आहे. येथील एका वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.
 
पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याचं समजताच वयोवृद्ध पतीनं आपल्या जीवाची बाजी लावून बिबट्याचा प्रतिकार केला आहे. त्यांनी शेवटपर्यंत झुंज देत बिबट्याला हार पत्करायला भाग पाडलं आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा बिबट्याने हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हे वृद्ध दाम्पत्य शेतात राहत असल्याने त्यांच्या मदतीला देखील कोणी येऊ शकलं नाही. पण वृद्ध दाम्पत्याने बिबट्याचा प्रतिकार करत हल्ला परतवून लावला आहे.
 
पार्वती सापटे असं बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 65 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर काशीनाश सापटे असं 72 वर्षीय पतीचं नाव आहे. संबंधित दाम्पत्य पाशेरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पारध्याची मेट परिसरात शेतात राहतात. घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सापटे दाम्पत्य आपल्या घरात झोपलं होतं. यावेळी घराबाहेर कसला तरी आवाज आला. यामुळे सावध झालेल्या पार्वती सापटे घराबाहेर कोण आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी दार उघडलं.
 
यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पार्वती यांच्यावर हल्ला केला. पार्वती यांचा किंचाळण्याचा आवाज ऐकताच 72 वर्षीय काशीनाथ धावत घराबाहेर आले. त्यांनी मोठ्या हिमतीनं बिबट्यावर प्रतिहल्ला चढवला. काहीवेळ झुंज दिल्यानंतर बिबट्यानं पार्वती यांना सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात पार्वती सापटे या गंभीर जखमी झाल्या आहेत. पती काशीनाथ यांच्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.