जवळपास तीन वर्षांपासून माझे वडील बेपत्ता आहेत. आता दिसले ते थेट एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीतच.”
भरत तांबे बीबीसी मराठीला सांगत होते. भरत तांबे यांचे वडील ज्ञानेश्वर तांबे गेल्या जवळपास तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. तांबे कुटुंबीय त्यांच्या परीने सर्वत्र शोध घेत होते. मात्र, ज्ञानेश्वर तांबेंचा काहीच पत्ता तांबे कुटुंबीयांना लागत नव्हता.
आणि हे ज्ञानेश्वर तांबे दिसले, ते थेट महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीवरच. ही जाहिरात होती तीर्थक्षेत्र पर्यटनाची.
आता आषाढी वारीचं निमित्त साधत महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली. या योजनेसंबंधी तुम्हाला अधिक माहिती इथे वाचता येईल.
या योजनेचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. यातील एका जाहिरातीवर ज्ञानेश्वर तांबे यांचं छायाचित्र छापण्यात आलंय.
या जाहिरात इन्स्टाग्रामवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आली होती. हे तांबे कुटुंबीयांच्या परिचयातील एका व्यक्तीनं पाहिली आणि ती तांबे कुटुंबीयांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
जाहिरातीत दिसले, पण आता ते सापडावेत ही इच्छा – तांबे कुटुंबीय
बीबीसी मराठीनं ज्ञानेश्वर तांबे यांचे पुत्र भरत तांबे यांच्याशी बातचित केली.
भरत तांबे सांगतात, “आमच्या वडिलांचं जाहिरातीत वापरण्यात आलेला फोटो नवा आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी मागच्या काही दिवसातच फोटो काढण्यात आला असावा, असं वाटतंय. याचा अर्थ ते सुखरुप आहेत, अशी आम्हाला आशा आहे. त्यांचा शोध लागावा आणि ते परत यावेत, असं आम्हाला वाटतंय.”
ज्ञानेश्वर तांबेंसंबंधी बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भरत तांबे यांच्याशी संपर्क साधला आणि ज्ञानेश्वर तांबेंच्या शोधासाठी विशेष पथकं पाठवल्याची माहिती त्यांनी भरत तांबेंना दिली.
भरत तांबे सांगतात, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांनी आश्वासन दिलंय की, आम्ही पथकं पाठवून ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेऊ.
मात्र, ज्या महाराष्ट्र सरकारनं ही जाहिरात प्रसिद्ध केली, त्यांच्याकडून अद्याप तांबे कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला नाहीय.
ज्ञानेश्वर तांबे हे सध्या अंदाजे 65 ते 68 वर्षे वयाचे आहेत, असं त्यांचे पुत्र भरत तांबे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीत सांगितलं. ज्ञानेश्वर तांबे हे वर्षानुवर्षे वारीत चालतात.
ज्ञानेश्वर तांबेंना भरत तांबे आणि सचिन तांबे अशी दोन मुलं आहेत. शिरूरमधील वरूडे या गावीच हे कुटुंब राहतं. ज्वारी-बाजारी अशा पिकांच्या शेतीवर या कुटुंबाचा उदर्निवाह चालतो.
ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे?
शिरुरमधील वरुडे गावचे पोलीस पाटील भाऊसाहेब शेवाळे म्हणतात, “ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे आमच्या गावाचे रहिवासी. त्यांची पत्नी गेल्यानंतर त्यांचा रहिवास गावात कमी असायचा. मग ते गाव सोडून जात, पाहुण्यांकडे राहत आणि परत येत असत. मात्र, दोन-अडीच वर्षांपूर्वी गावातून गेले, ते आलेच नाहीत.
“मध्यंतरी आळंदीत ब्लँकेट वाटप झालं होतं, तेव्हाही वृत्तपत्रातील जाहिरातीत ते दिसले होते. त्यावेळीही असाच प्रकार झाला होता. आताही शिंदे सरकारच्या जाहिरातीत ते दिसल्यानं आम्हाला आश्चर्यच वाटला आहे. मात्र, आता त्यांचा शोध लागावा आणि ते आमच्या गावातील परततील, अशी आम्हाला आशा आहे.”
तर तांबे कुटुंबीयांचे शेजारी असलेले आणखी एक ग्रामस्थ म्हणतात, “ज्ञानेश्वर तांबे बेपत्ता होते, त्यामुळे खंत वाटत होतीच. आता अचानक दिसल्यानं थोडी आशा वाढलीय.”
एकूणच शिरुरमधील हे वरुडे गाव आता ज्ञानेश्वर तांबेंचा शोध लागेल आणि ते गावात पुन्हा परत येतील, या आशेत आहेत आणि या आशेला महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीनं आणखी बळ दिलंय.
मात्र, या जाहिरातीवरून आता राजकीय टीकाही होऊ लागलीय.
जाहिरातबाज सरकारला, लोकांच्या भावनांशी घेणं-देणं नाही - अंधारे
या सर्व प्रकारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री महोदयांनी कितीही कंठशोष करून सांगितलं की, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, तरीही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक कृतीतून हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय की, हे सरकार सर्वसामान्यांचं नाहीय, लोककल्याणकारी नाहीय; हे सरकार भांडवलदार आणि ठेकेदारांचं आहे. जाहिरताबाजी करणाऱ्यांचं हे सरकार आहे.
“वारकऱ्यांच्या संबंधांने जी पर्यटन योजने घाईघाईने घोषित केली, त्यात वारकऱ्यांचं भलं करण्यापेक्षा स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा सोस इतका सरकारला झालाय की, जाहिरातीबाजी करताना पुण्यातल्या शिरूरमधील ज्ञानेश्वर तांबे नामक बेपत्ता वारकऱ्याचा फोटो जाहिरातीवर छापला.
“तीन वर्षांपासून हे तांबे कुटुंबीय ज्ञानेश्वर तांबेंना शोधत होते. आता हा जाहिरातीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लक्षात आलं की, सरकार स्वत:च्या जाहिरातीसाठी इतरांच्या भावनांशी खेळतंय. यावरून पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय की, सरकारला लोकांशी घेणं-देणं नाही, तर आपल्या मतांचं राजकारण करण्यात रस आहे.”
या प्रकरणाबाबत राज्य सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राज्य सरकारची प्रतिक्रिया मिळाल्यास इथे अपडेट केली जाईल.
Published By- Priya Dixit