बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (15:38 IST)

राष्ट्रवादी मुद्यावरून गुद्द्यावर आली; पडळकरांची पुन्हा टीका

सोलापूर : माझ्या राज्यभर होत असलेल्या घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहिलं आहे, असा सवाल भाजप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
 
पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. मी शरद पवारांवर काय टीका केली होती? मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?, असा प्रतिप्रश्न पडळकर यांनी केला. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट केला आहे.
 
विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे असं सांगताना मुद्द्यांवर बोला म्हणणारी राष्ट्रवादी आता गुद्द्यांवर का आली, असा सवाल पडळकर यांनी विचारला. दगडफेकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं पडळकर यांनी सांगितलं.
 
तुम्ही एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही : निलेश राणे
 
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक झाली. घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.
 
पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा गर्भित इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, अशी धमकीच निलेश राणेंनी दिली आहे.