गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (09:29 IST)

‘महाविकास आघाडीचा’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला!

uddhav thackeray
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेकविध घडामोडी घडत असतानाच महाविकास आघाडीचा लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत आज याबाबत प्रचंड खलबते झाली. अखेर सर्वानुमते याबाबत निर्णय घेण्यात आला.
 
दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीपुर्वी काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली.
 
बैठकीत नेमकं काय ठरलं?
यावेळी दोन-तीन जागा वगळता सर्व जागांवर तीनही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक जागा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना समसमान जागा मिळणार आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर आता तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता कमी आहे. आता फक्त दोन-तीन जागांबाबत अजून एकमत झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा
दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभेच्या 23 जागांवर यापूर्वीच दावा केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून याबाबत वारंवार भूमिका मांडण्यात आली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर टीका केली. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक संघर्ष बघायला मिळाला. तसेच जागावाटपाबाबत दिल्लीत निर्णय होतील, याबाबत दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होईल, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे कुणी नेते त्यावर भूमिका मांडत असतील तर त्याकडे आपण लक्ष देणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली होती. त्यावर नार्वेकरांनी टीका केली होती.
 
जागावाटपावरुन सातत्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असताना आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अखेर ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
Edited By - Ratnadeep ranshoor