बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (08:30 IST)

तमाशाचा फड १ फेब्रुवारीपासून रंगणार

येत्या १ फेब्रुवारीपासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना तसं आश्वासन मिळालेलं आहे. राज्यातील तमाशा कलावंतांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे
 
राज्यात तमाशा सुरु करण्यास परवानगी मिळावी यासाठी राज्यातील तमाशा कलावतांनी अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आता या आश्वसनानंतर सामूहिक आत्मदहन आंदोलन ही स्थगित करण्यात आलंय. २० जानेवारीला तमाशा पंढरी नारायणगावमधून अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करणार, असा इशारा तमाशा फड मालकांनी दिला होता. राज्य सरकारने या इशाऱ्याला गांभीर्याने घेत आज बैठक ठेवली. त्यात येत्या १ फेब्रुवारीपासून तमाशाला मुभा देण्यात येईल असं आश्वासन त्यांना मिळालेलं आहे.
 
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण तमाशा पुन्हा सुरू करू शकतो का याबाबत विचाराधीन असल्याचं सांगितलं. तसेच याबाबत आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ. तत्पूर्वी याबाबत मंत्रिमडळाशी चर्चा करून त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असं देखील म्हटलं आहे.
 
मागील दोन वर्षात कोरोनामुळे सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा बंद होत्या. त्यामुळे तमाशांना मागणीच नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यात्रा गर्दीने फुलतील, तमाशा फडाच्या सुपाऱ्या मिळतील अशी आशा या कलाकारांना आहे.