गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (08:28 IST)

आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं : दरेकर

केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मात्र, फक्त राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही. तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढणं गरजेचं असल्याचं मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. त्यावर आता अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी असल्याची खोचक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय. 
 
महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाही. ज्यावेळी राज्यांना अधिकार हवा होता त्यावेळी ते मागणी करत होते. आता केंद्र सरकारनं निर्णय घेतला तर त्यावरही टीका केली जात आहे. केंद्र सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. त्यामुळे 102व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, राज्य सरकारची हतबलता असल्यामुळे ते आरक्षण देऊ शकत नाहीत, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. आरक्षण देण्याची भूमिका आणि धाडस अशोक चव्हाण यांच्यात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. केंद्र सरकारनं आता निर्णय दिला असल्यामुळे राज्य सरकार हात वर करत आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.