गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:20 IST)

शिवरायांची यंदा 391वी जयंती, प्रत्येक गावात 391 झाडे लावू या आणि ती जगवू या

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली ती म्हणजे स्वराज्य. शिवरायांची यंदा 391 वी जयंती आहे, यानिमित्ताने प्रत्येक गावात 391 झाडे लावू या आणि ती जगवू या. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या,' असं आवाहन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
 
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार डॉ. कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर 391 देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत खासदार कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना 391 देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे.
 
प्रत्येक गावात 391 देशी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेनेही सहकार्य केले असून ही झाडे लावण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही ग्रामपंचायतींना केलं आहे. तसंच ज्या ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी वृक्षारोपणाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत आपण आपल्या फेसबुक पेजवर या ही छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करणार असल्याचंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.