उद्धव ठाकरे यांनी उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता- रवी राणा
उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला. तसंच उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यातही तत्कालीन सरकारचा हात आहे. त्यामुळे याप्रकरणाची आणि उद्धव ठाकरेंची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणीही राणा यांनी केली.
रवी राणांनी केले गंभीर आरोप
"हिंदू विचारांचे उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंच हत्या केली गेली होती. पण याचा तपास महिनाभर चोरीच्या उद्देशानं केला गेला. यासाठी काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता. उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. हे लक्षात आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन हे संपूर्ण प्रकरण लक्षात आणून दिलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियातील पोस्टमुळेच उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचं तपासात समोर आलं आहे. यामुळे तत्कालीन सरकारनं तपास दाबण्यासाठी प्रयत्न केले याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. तसंच उद्धव ठाकरेंच्या फोनचीही चौकशी केली गेली पाहिजे", असं रवी राणा म्हणाले.
Edited by: Ratnadeep Ranshoor