गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (08:29 IST)

विश्वास नांगरे-पाटीलकिरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ; जालना साखर कारखान्यात घोटाळा; पद्माकर मुळे, रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचेही नाव असल्याचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या जणू काही हात धुऊन मागे लागलेले आहेत, असे दिसून येते. या सरकार मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेले कथित भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सोमय्या रोजच पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करीत आहेत. आता त्यांच्या निशाण्यावर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटीलही आले आहेत.
 
शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात प्रचंड घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्ममाकर मुळे यांची नावे आहेत. या प्रकरणाची सीबीआय किंवा वरिष्ठ न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. हिम्मत असेल, तर माझ्या आरोपाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकरांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
 
सोमय्या पुढे म्हणाले की, जर भ्रष्टाचार केला नाही, तर शिवसेनेचे आनंद अडसूळ का लपून बसले आहेत? आता मी आणखी पुढे जाऊन अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत. जालना साखर कारखान्याचा मालक अर्जुन इंडस्ट्रीज आहे. त्याचे मालक अर्जुन खोतकर यांनी केली.
 
सोमय्या म्हणाले की, फेब्रुवारी २०१२ मध्ये कारखाना आजारी पडला. त्याचे टेंडर निघाले आणि निविदा तापडिया कंपनीच्या नावाने दिली गेली. या कंपनीने कारखाना विकत घेताना बांधकाम करणार म्हणून ताब्यात घेणार म्हटले. तसेच ४२ कोटी १८ लाख ६२ हजारांत तो विकत घेतला. मात्र महाराष्ट्र सहकारी बँकेला भरलेले ते पैसे कोणी दिले? जे जरंडेश्वर कारखान्यांत अजित पवारांनी केले तेच खोतकरांनी केले आहे. यात ६ शेअर होल्डर असून पैकी ५ जण खोतकर परिवारातील आहेत. जालना साखर कारखान्यांचे दोन मालक आहेत. अर्जुन खोतकर, पद्माकर मुळे आणि दुसरे नाव रुपाली विश्वास नांगरे-पाटील. नांगरे-पाटील म्हणजे मुंबई पोलीसचे सहआयुक्त अशी पुष्टीही सोमय्या यांनी जोडली.