बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (13:25 IST)

वर्धा अपघात : पुलावरुन 40 फूट खाली कोसळली कार, भाजप आमदाराच्या मुलासह7 MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील सेलसुराजवळ 'झायलो' कार नदीत कोसळली. या अपघातात एमबीबीएसच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. महामार्गालगत असलेले कठडे तोडून गाडी नदीवरील जुन्या आणि नवीन पुलाच्या मध्यभागी जवळपास 40 फूट खाली कोसळली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
 
सर्व मृत विद्यार्थी सावंगी येथेली मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे विद्यार्थी होते. यवतमाळहून वर्ध्याकडे परतताना हा अपघात झाला.
 
अपघातात ठार झालेल्यांमध्ये नीरज चव्हाण, आविष्कार रहांगडाले, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जैस्वाल, पवन शक्ती यांचा समावेश आहे.

विजय रहांगडाले गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार आहेत. अविष्कार रहांगडाले सावंगी मेघे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. यापैकी 6 विद्यार्थी सावंगी मेघे होस्टेलला राहणारे होते. यातील एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते बाहेर गेले होते अशी माहिती सावंगी मेघे मेडिकल कॉलेजचे विशेष कार्यकारी अधिकारी उदय मेघे यांनी दिली.
 
ते म्हणाले, "वाढदिवस साजरा करून लवकर परत येऊ अशी माहिती विद्यार्थांनी हॉस्टेल प्रशासनाला दिली होती. पण विद्यार्थी वेळेत आले नसल्याने आम्ही त्यांना आणि त्यांच्या पालकांना कळवले.
 
आम्हाला रात्री 2.30 वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. यातील दोन विद्यार्थी MBBS शेवटच्या वर्षी होते, एक विद्यार्थी इंटर्न होता. या सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना दुर्दवी आहे."
 
खासदार रामदास तडस यांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली. या घटनेची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
ही घटना दु:खद असून मृत पावलेल्या मुलांच्या कुटुंबाच्या आणि आमदार रहांगडाले यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.